
मोठी बातमी : अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट
Afghanistan Bomb Blast : अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. काबूल येथे अफगाणिस्तान प्रिमीयर लीगच्या सामन्यादरम्यान मैदानातच हा स्फोट झाल्याचं कळतंय. या घटनेनंतर मैदानात मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून, स्टेडियमवर हल्ला झाला तेव्हा तेथे संयुक्त राष्ट्राची एक व्यक्ती उपस्थित होती, जी मुलाखतीसाठी तेथे पोहोचली होती. बँड-ए-आमिर ड्रॅगन्स आणि पामीर जाल्मी यांच्यात सामना सुरू असताना हा स्फोट झाला आहे.
काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानच्या गेटजवळ स्फोट झाल्यानंतर दोन दिवसांनी हा स्फोट झाला आहे. त्याआधी जूनमध्ये काबुलच्या बाग-ए बाला परिसरात गुरुद्वारा कर्ते परवानमध्ये अनेक स्फोट झाले होते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. या स्फोटात शीख समुदायाच्या एका सदस्यासह दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर, मे महिन्यात काबूल आणि मजार-ए-शरीफ या उत्तरेकडील शहराला हादरवून सोडणाऱ्या चार स्फोटांमध्ये 14 लोक मारले गेले आणि 32 इतर जखमी झाले होते.