पाच कोटी भारतीयांना जाणवणार प्रथिनांची कमतरता

पाच कोटी भारतीयांना जाणवणार प्रथिनांची कमतरता

कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या उत्सर्जनाचा परिणाम; हार्वर्डमधील संस्थेच्या अभ्यासातील निष्कर्ष

बोस्टन: मानवनिर्मित कारणांमुळे उद्‌भवाणाऱ्या कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या उत्सर्जनाचा परिणाम म्हणजे तांदूळ, गहू व अन्य प्रमुख धान्यांमधील पौष्टिकता कमी होण्याची शक्‍यता असून, यामुळे 2050 पर्यंत भारतात पाच कोटी 30 लाख नागरिकांमध्ये प्रथिनांची कमतरता जाणवेल, असा इशारा अमेरिकेतील हार्वर्डमधील टी. एच. छान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने दिला आहे.

कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण सतत वाढत राहिले, तर 2050 पर्यंत 18 देशांमधील पाच टक्के नागरिकांच्या आहारात प्रथिनांचा अभाव निर्माण होईल, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. आणखी 15 कोटी नागरिकांच्या शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या अभ्यासाद्वारे धोक्‍याचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे. ""ज्या देशांना सर्वांत मोठा धोका आहे त्यांनी लोकसंख्यावाढ, सकस आहार यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच, या देशांनी कार्बन डाय-ऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी करण्यास प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे,'' असे हार्वर्डचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ सॅम्युअल मेयर्स यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर 76 टक्के नागरिकांना वनस्पतींपासून प्रथिने मिळतात, असे मत "एन्हायर्न्मेंटल हेल्थ परस्पेक्‍टिव्हज' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यास लेखात नोंदविले आहे. सध्याच्या व भविष्यातील प्रथिनांच्या कमतरतेचा अंदाज घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांमधील माहिती संशोधकांनी एकत्र केली. संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक आहारविषयक माहिती घेऊन कार्बन डाय-ऑक्‍साईडचा वातावरणातील उच्चघनतेच्या पिकांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. तसेच, वेतनातील व लोकसंख्येतील असमानता याचाही विचार करण्यात आला. कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या हवेतील वाढत्या प्रमाणामुळे तांदूळ, गहू, सातू आणि बटाटे यांच्यातील प्रथिनांचे प्रमाण अनुक्रमे 7.6 टक्के, 7.8, 14.1 आणि 6.4 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

आफ्रिकेतील सहारा उपखंडातील जनतेत प्रथिनांची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तेथे आणि भारतासह दक्षिण आशियायी देशांमधील नागरिकांच्या रोजच्या आहारात गहू व तांदळाचा वापर सर्वाधिक असतो, तेथे पुरेशा प्रथिनांचे आव्हान कायम असल्याचे संशोधकांना निदर्शनास आले आहे.

लोह व जस्ताच्या कमतरतेचाही धोका
कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या प्रभावामुळे मुख्य धान्यांमधील लोहाचे प्रमाण बिघडते, त्यामुळे प्रथिनांप्रमाणेच शरीरात लोहाचा अभाव ही समस्याही जगभरात प्रकर्षाने दिसली आहे. दक्षिण आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमधील एकूण लोकसंख्येपैकी 35 कोटी 40 लाख मुलांमध्ये व दहा लाख 60 हजार महिलांमध्ये लोहाच्या कमरतेचा धोका जास्त आहे. अशा देशांमध्ये रक्तक्षयाच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. कार्बन डाय-ऑक्‍साईडमुळे या देशामधील आहारातून लोहाचे प्रमाण 3.8 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता या अभ्यासात नोंदविली आहे. 20 कोटी नागरिकांमध्ये जस्ताचे प्रमाणही कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

पिकांतील प्रथिनांमधील घट (आकडेवारी टक्‍क्‍यांत)
7.6
तांदूळ

7.8
गहू

14.1
सातू

6.4
बटाटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com