Video : 'हा' ठरला जगातील सर्वात 'पॉवरफुल' सेल्फी!

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सोशल मीडियावर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, सेलिब्रिटीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत हव्या त्या पोजमध्ये अगदी तोंडाचा चंबू करत सेल्फी काढलेले आपण पाहतोच.

ह्युस्टन : जगातील दोन बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत सेल्फी काढण्याचा योग आला तर? हा विचारच कल्पनांचे इमले बांधत दूरवर जातो. काल एक अशीच घटना आणि आज याचं लोण जगभर पसरलं. एका लहान मुलानं काढलेल्या सेल्फीची चर्चा आता जगभर सुरू आहे.

भारत आणि अमेरिका या देशांची आपली स्वत:ची ओळख आहे. भारत एक विकसनशील देश असून सध्या तो महासत्तेच्या दृष्टीने प्रवास करत आहे. तर अमेरिका हा महासत्ता बनलेला देश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या प्रभावी नेतृत्त्व म्हणून जगभरात चर्चा सुरू आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:ची वेगळी ओळख बनविली आहे. या दोन देशांचे द्विपक्षीय संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले होतेच, पण काल ह्युस्टनमध्ये झालेल्या 'हाऊडी, मोदी' या कार्यक्रमामुळे ते आणखी बळकट झाल्याचे सर्व जगाने पाहिले.

'हाऊडी मोदी' कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियम येथे उपस्थित असलेल्या आणि टेलिव्हिजनवरून पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या करोडो चाहत्यांना आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केले. भाषण संपल्यानंतर जेव्हा मोदी आणि ट्रम्प स्टेजवरून बाहेर पडण्यासाठी निघाले, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका साधारण 12-13 वर्षाच्या मुलाने थेट ट्रम्प यांनाच 'मी तुमच्यासोबत एक सेल्फी काढू शकतो का?' असा प्रश्न विचारला. 

एक लहान मुलगा जगातील महासत्ता असलेल्या राष्ट्राच्या अध्यक्षांना थेट सेल्फी काढू शकतो का? हा प्रश्न विचारतो, हे पाहून ट्रम्प यांनी क्षणाचाही विलंब न लावता सेल्फीसाठी तयारी दर्शविली. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनाही बोलावून घेत त्या लहानग्या मुलासोबत सेल्फी काढला. त्यावेळी तिथेच शेजारी उभ्या असलेल्या 7-8 मुलींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पाहायला मिळाले. या मुलाने केलेल्या धाडसाबद्दल ट्रम्प यांनी त्याचे कौतुकही केले. तसेच मोदींनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

सोशल मीडियावर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, सेलिब्रिटीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत हव्या त्या पोजमध्ये अगदी तोंडाचा चंबू करत सेल्फी काढलेले आपण पाहतोच. मात्र, अमेरिका आणि भारत या जगातील दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत सेल्फी काढण्याचा दुर्मिळ योग मिळणं म्हणजे नशीबच म्हणायचं.

या लहान मुलानं मोदी-ट्रम्प यांच्यासोबत काढलेला सेल्फी आता जगातील सर्वात पॉवरफुल सेल्फी ठरला आहे. हा सेल्फी आणि त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत या मुलाची ओळख पटवून देण्याचे आवाहन केले तसेच आपण किती एकमेकांशी जोडले गेले आहोत, असे म्हटले आहे. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाचा मूळ उद्देश सार्थ ठरवलाच, पण शेवटी जाता जाता त्या मुलाचा तो दिवस  कायम संस्मरणीय राहिल असा बनवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy click selfie with US President Donald Trump and Indias Prime Minister Narendra Modi