'ब्रेक्‍झिट'मुळे काय होईल?

सुहास राजदेरकर
मंगळवार, 21 जून 2016

ब्रिटन हा देश युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय नजीकच्या काळात होण्याची शक्‍यता आहे. ‘ब्रेक्‍झिट‘ ही एक क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असून, ती पूर्ण व्हायला 10 वर्षेसुद्धा लागू शकतील. पण यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी तज्ज्ञांची उलट-सुलट मते आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप.... 

ब्रिटन हा देश युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय नजीकच्या काळात होण्याची शक्‍यता आहे. ‘ब्रेक्‍झिट‘ ही एक क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असून, ती पूर्ण व्हायला 10 वर्षेसुद्धा लागू शकतील. पण यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी तज्ज्ञांची उलट-सुलट मते आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप.... 

मागील काही दिवसांपासून ‘ब्रेक्‍झिट‘ हा शब्द बराच चर्चेत आहे. ‘ब्रिटीश एक्‍झिट‘ याचा शॉर्टफॉर्म म्हणजेच ‘ब्रेक्‍झिट‘. ब्रिटन हा देश युरोपीय युनियन (ईयू) मधून बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. त्याची कारणे शोधण्यापूर्वी युरोपीय युनियन का अस्तित्वात आली, ते पाहू. शेजारील देशांशी सतत होणारी युद्धे थांबविण्यासाठी; तसेच एकमेकांमध्ये व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्रामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी 1950 मध्ये युरोपीय युनियन या संकल्पनेचा उदय झाला. यामध्ये सुरवातीला सहा देश सामील होते, त्यांची संख्या आता 28 वर पोचली आहे. कालांतराने 1999 मध्ये या सर्व देशांचे मिळून एकच चलन अस्तित्वात आले ते म्हणजे ‘युरो‘. परंतु आता ब्रिटनला युरोपीय युनियनमधून बाहेर पडावे असे का वाटावे, हे थोडक्‍यात पाहूया... 

युरोपीय युनियनमध्ये असणाऱ्या प्रत्येक देशाला युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याचा हक्क आहे. युरोपीय कमिशनचे कार्य पारदर्शक नसून, त्यांना बरेच अधिकार आहेत; जसे की युरोपीय युनियनचे सभासदत्व देणे. बहुतांश उद्योगधंदे जसे शेती, तसेच मासेमारी हे युरोपीय युनियनच्या निर्देशानुसारच केले जातात, जे ब्रिटनला अडचणीचे वाटते. ब्रिटनमधील काही प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञांच्या मते युरो हे चलन फायद्याचे नाही. युरोपीय युनियनचे सभासद राहण्यासाठी ब्रिटनला दर वर्षी मोठा खर्च (फी) करावा लागतो, जो 17 अब्ज पौंड इतका आहे. 

‘ब्रेक्‍झिट‘मुळे ब्रिटनवर होणारे परिणाम : 

‘ब्रेक्‍झिट‘ ही एक क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असून, ती पूर्ण व्हायला 10 वर्षेसुद्धा लागू शकतील. यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी तज्ज्ञांची यावर उलट-सुलट मते आहेत. तत्काळ आणि थोड्या अवधीमध्ये होणारे परिणाम पुढीलप्रमाणे असू शकतील - 

1) ब्रिटन आणि अन्य युरोपीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड होईल, जी पुढील सहा महिन्यांमध्ये 15 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊ शकते, 2) ब्रिटनचे क्रेडिट रेटिंग खाली जाऊ शकते, ज्यामुळे त्यांना पैसे जास्त व्याजदराने उपलब्ध होतील, 3) ब्रिटनला युरोपचे ‘गेट वे‘ म्हणजेच प्रवेशद्वार समजतात. परंतु आता तेथील थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) कमी होऊ शकते, 4) रिअल इस्टेटच्या (स्थावर मालमत्ता) किमती घसरण्याची शक्‍यता आहे, 5) आयात महाग झाल्यामुळे चलनवाढ वाढेल, 6) डॉलरच्या तुलनेत ब्रिटीश पौंड आणि युरो या चलनांची घसरण होईल (सुरू झाली आहे). परंतु याचा दोन वस्तूंना फायदा होतो आहे, त्या म्हणजे कोको आणि युके नैसर्गिक गॅस. कारण या दोन वस्तू ब्रिटीश पौंडामध्ये विकल्या जातात, 7) सेवा क्षेत्रावर होणारा परिणाम मोठा असेल. उद्योगधंदे ब्रिटनच्या बाहेर जाऊन रोजगार कमी होण्याची शक्‍यता आहे. परंतु काहींच्या मते, ब्रिटन ही युरोपची आर्थिक राजधानी असून, उद्योगधंदे बाहेर जाणार नाहीत. पुढील 15 वर्षांत ब्रिटनचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 2.2 टक्‍क्‍यांनी घटेल, तर काही तज्ज्ञ म्हणतात, की ब्रिटनने संपूर्ण जगाशी उदारमतवादी धोरण ठेवले तर ते 1.6 टक्‍क्‍यांनी वाढेल. बऱ्याच तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे, की ब्रिटन हा युरोपीय युनियनमध्ये राहिला, तर तो जास्त सुरक्षित आणि मजबूत राहील. 

इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम : 

‘ब्रेक्‍झिट‘चा सर्वांत मोठा परिणाम विविध देशांच्या चलनांवर होण्याची शक्‍यता आहे. खनिज तेल हे सामान्यतः त्याच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार खाली-वर होत असते. या वर्षभरात पुरवठा बिघडल्यामुळे आणि अमेरिकी डॉलरमध्ये घट झाल्यामुळे तेलाच्या किमती 70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्या आहेत. परंतु बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ‘ब्रेक्‍झिट‘मुळे अमेरिकी डॉलर मजबूत होईल आणि तेलाच्या किमतीत घट येऊ शकेल. ‘ब्रेक्‍झिट‘च्या शक्‍यतेमुळे जगात सोने-चांदीचे भाव वाढायला लागले आहेत व ते अजून वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अमेरिकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार केला, तर शेअर बाजार युरोपच्या तुलनेमध्ये वाढेल, अमेरिकी डॉलर मजबूत होईल आणि स्विस फ्रांक आणि येन हे चलन मजबूत होईल. तसेच आशियाई देशांचा विचार केला तर कंबोडिया, व्हिएतनाम आणि हॉंगकॉंग यांची ब्रिटनला निर्यात जास्त असल्यामुळे हे देश सोडले तर अन्य आशियाई देशांवर फारसा परिणाम व्हायला नको. इतर युरोपीय देशांवर परिणाम झाल्याने त्याचा आशियाई देशांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. इतर देशांच्या मध्यवर्ती बॅंका त्यांच्या देशांची चलने स्थिर ठेवण्याच्या हेतूने, त्यांची पतधोरणे तात्पुरती ‘जैसे थे‘ ठेवतील. 

भारतावर काय परिणाम होऊ शकतील? 

भारतातील ज्या कंपन्यांचे युरोप आणि ब्रिटनमध्ये व्यापार, व्यवसाय आणि निर्यातसंबंध जास्त असतील, त्या कंपन्यांवर नकारात्मक परिणाम संभवतो. पुढील काही काळात जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाल्यास भारतात येणाऱ्या पैशांच्या ओघावर परिणाम होऊ शकतो. यामुळे शेअर बाजार आणि चलन अस्थिर होईल. उदा. एकेदिवशी (15 जून) अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविणार नाहीत असे कळल्याने आपला शेअर बाजार 300 अंशांनी वर जातो आणि दुसऱ्याच दिवशी (16 जून) ब्रिटन हा देश युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार, या भीतीने परत 200 अंशांनी खाली जातो. परंतु दीर्घकाळात ‘फेड रेट‘ आणि ‘युआनची घसरण‘ या गोष्टी ‘ब्रेक्‍झिट‘पेक्षा जास्त परिणाम करणाऱ्या ठरतील. 

ब्रिटन हा देश युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय नजीकच्या काळात होण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत तरी शेअर बाजार अस्थिर राहील, असे वाटते. वर उल्लेख केलेले परिणाम हे अर्थशास्त्रीयदृष्ट्या तर्कशुद्ध असले, तरी आतापर्यंत बाजारांनी अशा प्रसंगांना जी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहता एकच सांगावेसे वाटते, की शेअर बाजाराला अशा प्रसंगांपेक्षा ‘अनिश्‍चितता‘ आवडत नाही. कालांतराने ही अनिश्‍चितता संपुष्टात येईल. त्यामुळेच सामान्य गुंतवणूकदारांनी याकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि जर का शेअर बाजार खाली गेला, तर चांगले शेअर आणि म्युच्युअल फंडांच्या चांगल्या इक्विटी योजनांत गुंतवणूक वाढविणे योग्य ठरू शकेल. 

(लेखक ए3एस फायनान्शिअल सोल्युशन्सचे संचालक आहेत.)

Web Title: Britain - Suhas Rajdarekar