कॅनडा: बढाईखोर संरक्षण मंत्र्यांवर टीकेचा भडिमार

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा कॅनडामधील नागरिकांची दिशाभूल केली आहे. सतत खोटे बोलणाऱ्या या माणसाची पंतप्रधान हकालपट्टी का करत नाहीत

ओटावा - कॅनडामधील भारतीय वंशाचे संरक्षण मंत्री असलेल्या हरजित सज्जन यांनी स्वत:ची कामगिरी फुगवून सांगितल्याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त विरोधकांनी केली आहे.

सज्जन यांनी भारतामधील एका भाषणामध्ये अफगाणिस्तानमधील त्यांच्या लष्करी कामगिरीबद्दल बोलताना दिशाभूल करणारी माहिती दिली होती. कॅनडाचे माजी वरिष्ठ गुप्तचर अधिकारी असलेल्या सज्जन यांनी "ऑपरेशन मेडुसा' या कॅनडाने अफगाणिस्तानमध्ये राबविलेल्या मोहिमेचे शिल्पकार असल्याचा दावा केला होता. ऑपरेशन मेडुसा ही कॅनडाकडून 1950 नंतर राबविण्यात आलेली सर्वांत मोठी लष्करी मोहिम होती. 2006 मध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये तालिबानला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले होते. या मोहिमेमुळे कंदाहार प्रांतामधील तालिबानचा प्रभाव कमी झाला होता.

"कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा कॅनडामधील नागरिकांची दिशाभूल केली आहे. सतत खोटे बोलणाऱ्या या माणसाची पंतप्रधान हकालपट्टी का करत नाहीत,'' अशी संतप्त विचारणा कॅनडामधील विरोधी पक्ष नेत्या रोना अँब्रोस यांनी केली आहे. याआधी 2015 मध्येही सज्जन यांनी अशा स्वरुपाचा दावा केला होता.ताशाच स्वरुपाची टीका कॅनडामधील अन्य राजकीय नेत्यांनीही केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सज्जन यांनी संसदेची माफी मागितली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी मात्र सज्जन यांची पाठराखण केली आहे. "सज्जन यांनी माफी मागितली आहे. आपली चूक झाल्याचे त्यांना कळले आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. कॅनडाच्या नागरिकांची त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. सज्जन यांनी पोलिस अधिकारी, सैनिक आणि मंत्री अशा अनेक माध्यमांमधून देशाची सेवा केली आहे. आणि माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे,'' असे त्रुडो यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Canada's Indian-origin defence minister urged to resign for inflating military record