बापरे! आता 'चापरे'! कोरोनापेक्षाही भयावह व्हायरसची भीती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून गेल्या मंगळवारी एक वर्ष पूर्ण झालं.

नवी दिल्ली : गेल्या एक वर्षापासून कोरोना नावाच्या विषाणूने अवघ्या जगात थैमान घातले आहेत. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून गेल्या मंगळवारी एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, अद्यापही कोरोनावर कोणताही उपचार अथवा लस विकसित झालेली नाहीये. अनेक युरोपिय देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाची ही दहशत अद्याप तशीच असताना आता आणखी एक संसर्गजन्य अशा विषाणूचा शोध लागला आहे. 

याबाबतची माहिती अमेरिकेतील एका आरोग्य विषयक संस्थेने दिली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने असा विषाणू सापडला असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. चापरे असं या विषाणूचं नाव आहे, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. या विषाणूच्या संसर्गाचे पुरावे हे बोलिव्हियामध्ये सापडले आहेत. या विषाणूच्या संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीला ताप येतो. हा ताप साधासुधा नसून थेट मानवी मेंदूवर  परिणाम करतो ज्यामुळे ब्रेन हॅमरेजचा धोका बळावतो. या विषाणूचे साधर्म्य इबोला विषाणूशी आहे. तो देखील धोकादायक असा विषाणू होता मात्र, त्यावर नियंत्रण मिळवण्यात लवकर यश प्राप्त झालं. 

हेही वाचा - संयुक्त राष्ट्रात सुधारणेची गरज; ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

चापरे हा व्हायरस सर्वांत आधी 2004 साली बोलिव्हियातील चापरे भागात आढळून आला होता. याबाबतचं वृत्त देताना लाईव्ह सायन्सने म्हटलं होतं की, सीडीसीने 2019 साली या विषाणूची बाधा तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना झाली असल्याचं स्पष्ट केलं होतं. या तीन जणांपैकी दोन व्यक्तींचा मृत्यू या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झाला होता. या विषाणूच्या संसर्गाचा परिणाम कोरोना अथवा इतर फ्लूच्य तुलनेत फार लवकर दिसून येतो तसेच याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने संपर्कात आलेल्या व्यक्तीला याची बाधा होण्याची संभावना जास्त असते. मात्र, याचा प्रादुर्भाव जर साथीच्या आजारात झाला तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडेल अशी भीती संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

'चापरे'ची लक्षणे काय?

चापरे विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या, हिरड्यांतून रक्त येणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर व्रण उठणे अशी लक्षणे सामान्यत: दिसून येतात. या विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणताही उपचार नसल्याची माहिती आहे. हा विषाणूदेखील कोरोनाप्रमाणेच नवखा असून अद्याप या विषाणूच्या प्रादुर्भावावबाबत संभ्रम आहे. 

हेही वाचा - 'मी ट्रम्प यांना माफ करायला तयार नव्हते; पण तरीही व्हाईट हाऊसमध्ये केलं स्वागत'

'चापरे'वर उपचार काय?
2019 मध्ये चापरे विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याचं कळलं. चापरे झालेल्या रुग्णांना डेंग्यू झाल्याचे समजून उपचार करण्यात आले होते. याबाबत संशोधक मारिया मोराल्स यांनी सांगितलं की, दक्षिण अमेरिकेत डेंग्यू हा आजार सामान्य असून यामध्ये आणि चापरे विषाणूत बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आहे. यावर अद्याप कसलाही उपचार उपलब्ध नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chapare virus all about the virus chapare can be transferred between humans through bodily fluids