मसूदबाबतची भूमिका न्याय्य आणि व्यावहारिकच

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

भारताने आमच्यावर दुटप्पीपणाचा केलेला आरोप चुकीचा असून, आम्ही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावरच निर्णय घेतला आहे. मसूदच्या मुद्यावर सर्व सदस्यांना चर्चेसाठी योग्य वेळ मिळावा, या हेतूनेच चीनने भारताच्या मागणीला तूर्त पाठिंबा दिलेला नाही

बीजिंग - जैशे महंमद या दहशतवादी संघनेचा म्होरक्‍या अझर मसूदबाबत दुटप्पी भूमिका स्वीकारत असल्याचा भारताने केलेला आरोप चीनने आज फेटाळला. मसूदबाबत संयुक्त राष्ट्रसंघात आपण घेतलेली भूमिका अत्यंत व्यावहारिक आणि न्याय्य असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी आज स्पष्ट केले.

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी काल (ता. 4) राष्ट्रसंघामध्ये अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. "चीनने केवळ ही भारताची मागणी म्हणून न पाहता जगाची गरज म्हणून पाहावे. पाकिस्तानला दहशतवादाला असलेला पाठिंबा पाहता त्यांना मदत करणाऱ्या चीनने त्यांच्या भूमिकेमागील दुटप्पीपणा ओळखावा,' असे अकबर यांनी म्हटले होते. यावर आज पत्रकार परिषद घेत चीनने भारताचा आरोप फेटाळून लावला.

"भारताने आमच्यावर दुटप्पीपणाचा केलेला आरोप चुकीचा असून, आम्ही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावरच निर्णय घेतला आहे. मसूदच्या मुद्यावर सर्व सदस्यांना चर्चेसाठी योग्य वेळ मिळावा, या हेतूनेच चीनने भारताच्या मागणीला तूर्त पाठिंबा दिलेला नाही,' असे शुआंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील दहशतवादविरोधी समितीच्या 15 सदस्यांपैकी केवळ चीननेच मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या मागणीला विरोध केला आहे.
 

Web Title: China adamant over Masood Azhar