द. चिनी समुद्रात चीनकडून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

चीनकडून गेल्या काही वर्षांत युद्धपातळीवर बांधण्यात आलेल्या या बेटांवर हवाई तळ, रडार व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा झपाट्याने विकसित करण्यात आल्या आहेत. या भागामधील "सागरी सुरक्षे'साठी ही बेटे बांधण्यात आल्याचा चीनचा दावा आहे.

वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रामधील मानवनिर्मित बेटांवर चीनकडून विमानविरोधी व क्षेपणास्त्रविरोधी शस्त्रप्रणाली बसविण्यात आल्याचे अमेरिकेमधील एका प्रसिद्ध थिंक टॅंकने यासंदर्भातील एका अहवालामध्ये म्हटले आहे.

दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून सात कृत्रिम बेटे तयार करण्यात आली आहेत. या सातही बेटांवर क्षेपणास्त्रभेदी शस्त्रप्रणाली बसविण्यात आल्याचे "सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज' या थिंक टॅंकने म्हटले आहे.
चीनकडून गेल्या काही वर्षांत युद्धपातळीवर बांधण्यात आलेल्या या बेटांवर हवाई तळ, रडार व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा झपाट्याने विकसित करण्यात आल्या आहेत.

या भागामधील "सागरी सुरक्षे'साठी ही बेटे बांधण्यात आल्याचा चीनचा दावा आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या 90 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त भागावर चीनने हक्क सांगितला असून यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय चीनकडून धुडकावून लावण्यात आला आहे.

अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारादरम्यान दक्षिण चीनमधील दांडगाईच्या मुद्यावरुन चीनला सातत्याने लक्ष्य केले होते. निवडणुकीनंतर ट्रम्प व चीनमधील संघर्ष अधिकच भडकल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, दक्षिण चिनी समुद्रामधील ही नवीन घडामोड अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: China adds weapons to South China Sea islands