सिंधु नदीवरही चीन बांधणार धरण: पाकचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये सध्या कोणत्याही मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा समावेश नाही. यामुळे या प्रकल्पाचा समावेश चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये करण्यासंदर्भातील प्रस्तावाचा पाकिस्तान व चीनकडूनही गांभीर्याने विचार करण्यात येत आहे

नवी दिल्ली - भारताचा विरोध असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र प्रकल्पांतर्गत चीन सिंधु नदीवर मोठे धरण बांधणार असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तानमधील सरकारी मालकीच्या रेडिओच्या माध्यमामधून हे वृत्त देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14 अब्ज डॉलर्स खर्च येण्याचा अंदाज आहे. पाकला या प्रकल्पासाठी चीनचे अर्थसहाय्य मिळण्याची "अपेक्षा' असल्याचे विधान अहसान इक्‍बाल या पाकिस्तानी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.

सिंधु नदीवरील या "दायमर-बाशा' धरणास भारताचा विरोध असल्याने जागतिक बॅंक व आशियाई विकास बॅंकेने या प्रकल्पास अर्थसहाय्य देण्यास नकार दिला आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान क्षेत्रात या प्रकल्पाचे स्थान आहे.

"चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये सध्या कोणत्याही मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा समावेश नाही. यामुळे या प्रकल्पाचा समावेश चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये करण्यासंदर्भातील प्रस्तावाचा पाकिस्तान व चीनकडूनही गांभीर्याने विचार करण्यात येत आहे,'' असे पाकिस्तानमधील सरकारी वीजमंडळाचे अध्यक्ष असलेल्या मुझमील हुसेन यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.

सुमारे दोन वर्षांपूर्वी जागतिक बॅंकेने या प्रकल्पासाठी पाकिस्तानने भारताकडून "ना हरकत प्रमाणपत्र' न घेतल्याने यासंदर्भात अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात या प्रकल्पास "तत्वत:' संमती दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 4500 मेगावॅट वीजनिर्मिती होण्याची पाकला अपेक्षा आहे.

Web Title: China to build dam on indus river?