भारताने "न ऐकल्यास' चीनकडून बळाचा वापर शक्‍य...

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

भारताला पटवून देण्यासाठी चीन ऐतिहासिक घटनांचा दाखला देत असून, हा प्रश्‍न शांततामय मार्गाने सोडविण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने हे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिल्यास समस्या सोडविण्यासाठी सैन्यबळाचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय चीनसमोर उपलब्ध असणार नाही

बीजिंग - भारताने "आडमुठेपणा' कायम ठेवत चीनचे "न ऐकल्यास' सिक्कीममधील वाद मिटविण्यासाठी चीनला सैन्यबळाचा वापर करावा लागेल, असा इशारा येथील तज्ज्ञांनी दिला आहे. सिक्कीममधील डोकलाम भागात हद्दीच्या वादातून जवळपास एक महिन्यापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे.

भारत आणि चीनमधील हा वाद योग्यरीतीने न हाताळल्यास त्याची परिणती युद्धात होऊ शकते, असे चीनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांमधील सैन्य 1962 नंतर सर्वप्रथमच सर्वाधिक काळ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. "भारताला पटवून देण्यासाठी चीन ऐतिहासिक घटनांचा दाखला देत असून, हा प्रश्‍न शांततामय मार्गाने सोडविण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने हे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिल्यास समस्या सोडविण्यासाठी सैन्यबळाचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय चीनसमोर उपलब्ध असणार नाही,' असे मत शांघाय अकादमीमधील आंतरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञ हु झियॉंग यांनी म्हटले आहे.

आपण चीनशी सामना करू शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत असतानाच भारताला सिद्ध करायचे होते, त्यामुळेच त्यांनी चीनला डिवचले असल्याचा दावाही झियॉंग यांनी केला आहे. "मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बराक ओबामा यांच्याप्रमाणे नाहीत. ओबामांना भारत हा मित्र वाटत होता, तर ट्रम्प हे मोदींना फारसे महत्त्व देत नाहीत. कारण, चीनच्या तुलनेत भारत दुर्बल आहे, हे त्यांना माहीत आहे,' असेही झियॉंग यांनी म्हटले आहे.

भारत जरी चीनला मोठा शत्रू मानत असला तरी, हा देश चीनपेक्षा फारच मागे असल्याने चीन त्यांना शत्रू मानत नाही, असेही मत येथील काही तज्ज्ञांनी मांडले आहे. भारत आणि चीनच्या लष्करी सामर्थ्यात मोठे अंतर असल्याने भारताने शांत बसण्यातच शहाणपणा आहे, असा सल्ला या तज्ज्ञांनी दिला आहे.

1962 नंतर दोन्ही सैन्यांमध्ये सर्वांत अधिक काळ सुरू असलेला हा तणाव आहे. 2013 मध्ये लडाख भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती, त्या वेळी 21 दिवस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर होते. नंतर मात्र चिनी सैनिकांना सीमेपलीकडे ढकलण्यात आले होते.

Web Title: China can use force, warn experts