अरुणाचल हा वादग्रस्त भाग- चीनचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

अरुणाचलमध्ये चौदावे दलाई लामा यांना जाण्याची परवानगी देऊन भारताने तिबेट आणि सीमा वादासंबंधीची वचने पाळली नाहीत, असा आरोप चीनने केला आहे. 

बीजिंग : अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग नसून तो भारत-चीन सीमेवरील वादग्रस्त भाग आहे, असे चीनने बुधवारी म्हटले आहे. अरुणाचलमध्ये चौदावे दलाई लामा यांना जाण्याची परवानगी देऊन भारताने तिबेट आणि सीमा वादासंबंधीची वचने पाळली नाहीत, असा आरोप चीनने केला आहे. 

दलाई लामा आणि भारतीय अधिकाऱ्यांनी प्रक्षोभक भाषणे केली असून, त्यामुळे प्रादेशिक वाद चर्चेने मिटविण्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल, असा दावा चीनच्या परराष्ट्र खात्याने केला आहे. 

"इतिहासातून आपण धडे घेतले पाहिजेत," असे चिनी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लू कँग पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. सीमावादावरील भारत-चीन चर्चा फिसकटली काय होईल याचा हा इशारा आहे असाही कँग यांच्या वक्तव्याचा अर्थ लावला जात आहे. 

तत्पूर्वी, चिनी सरकारच्या नियंत्रणाखालील चायना डेली या वृत्तपत्राने आपल्या संपादकीय लेखात अरुणाचलचा दक्षिण तिबेट असा उल्लेख करीत म्हटले आहे की, येथील लोक भारताच्या बेकायदेशीर अंमलाखाली कठीण आयुष्य जगत आहेत. तिथे त्यांना विविध प्रकारच्या भेदभावाला तोंड द्यावे लागते. आणि ते पुन्हा चीनमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत, असे त्यामध्ये म्हटले आहे. 
 

Web Title: china claims arunachal is disputed border area