कोरोना आम्ही पसरवला नाही तर फक्त शोधला; चीनचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार झाल्याचे आरोप चीनने फेटाळून लावले आहेत. 

बिजिंग - जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. यावरून जगातील अनेक देशांनी चीनवर टीका केली आहे. दरम्यान, आता चीनने शुक्रवारी वेगळाच दावा केला आहे. कोरोना चीनमधून पसरलेला नाही असं चीनने म्हटलं आहे. वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार झाल्याचे आरोप चीनने फेटाळून लावले आहेत. 
चीनने अमेरिकेनं केलेले आरोप फेटाळून लावताना म्हटलं की, गेल्या वर्षी जगातील वेगवेगळ्या भागात कोरोना पसरला होता. मात्र त्याची माहिती सर्वात आधी चीनने दिली. तसंच वटवाघळांपासून माणसांमध्ये कोरोनाचं संक्रमण चीनमध्ये झाल्याचा आरोपही त्यांनी नाकारला. 

हेही वाचा - हा तर वेळेचा अपव्यय; ट्रम्प यांच्या नकारानंतर प्रेसिडेन्शियल डिबेट रद्द
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोरोना व्हायरस हा एक नव्या प्रकारचा व्हायरस आहे. गेल्या वर्षी अखेरच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागात कोरोना पसरला होता. तर चीनने सर्वात आधी या व्हायरसबद्दल जगाला माहिती दिली होती.

हेही वाचा - ॲरिझोनाला कमला हॅरीस यांची साद
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनच्या सत्ताधारी पक्षावर आरोप केला होती की, कोरोनावर चीनने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जगापासून कोरोनाचे सत्य लपवले असंही म्हटलं होतं. यावर चीनने उत्तर दिलं आहे. आतापर्यंत जगभरात 3 कोटी 60 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दहा लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.  जगात सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकेत आढळले असून जवळपास 76 लाख कोरोनाचे रुग्ण आहेत. याशिवाय 2 लाखांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. 
जगात कोरोना पसरवल्याचा आरोप होणाऱ्या चीनमध्ये कोरोनाचे फक्त 90 हजार 736 रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे. तर 4 हजार 739 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china claims we detect corona which spread in world already