China Export : चीनच्या निर्यातीत साडेसात टक्क्यांनी घट; अहवालातून स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China exports drop by seven and half percent financial report China economy

China Export : चीनच्या निर्यातीत साडेसात टक्क्यांनी घट; अहवालातून स्पष्ट

बीजिंग : जगभरातून होणारी मागणी घटल्याचा परिणाम म्हणून मे महिन्यातील चीनची निर्यात साडेसात टक्क्यांनी घटली आहे, तर आयातीमध्येही साडेचार टक्क्यांनी घट झाली आहे. एका आर्थिक सर्वेक्षण कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

या अहवालानुसार, एप्रिल महिन्यात चीनच्या निर्यातीमध्ये अनपेक्षितपणे साडेआठ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर, मे महिन्यात पुन्हा या देशाची निर्यात घसरून ती २८३.५ अब्ज डॉलरपर्यंत आली आहे. चीनच्या आयातीमध्ये ७.९ टक्के घसरण होऊन ती २१७.७ अब्जांवर आली आहे.

या देशाच्या जागतिक व्यापारवृद्धीच्या प्रमाणातही १६.१ टक्क्यांनी घसरण होऊन ती ६५.८ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनमध्ये उद्योगधंद्यांमध्ये आलेली मंदी, बाजारात मंदावलेली उलाढाल आणि त्याच्याच जोडीला बेरोजगारीच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चीनची अर्थव्यवस्था अशीच मंदावलेली राहणार असून, कदाचित अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतही मंदी येऊ शकते, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना साथीमुळे लागू केलेले वाहतूक निर्बंध हटविल्यानंतर बाजारातील उलाढाल वाढली होती.

मात्र, उलाढाल वाढीचा काळ आता सरला असल्याचा इशाराही अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती आणि नोकरी गमावण्याची भीती असल्याने येथील ग्राहक खरेदीबाबत अजूनही बऱ्यापैकी निरुत्साही आहे.

एप्रिल महिन्यात सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, चीनमधील दर पाच तरुणांमागे एक जण बेरोजगार आहे. व्याजदरातील वाढीनंतर युरोप आणि अमेरिकेतील कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्यानेही देशाच्या निर्यातीत अजूनही वाढ होत नाही.

टॅग्स :China