...तर अमेरिकेच्या शत्रुंना थेट मदत करु: चीन

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

चीनकडून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी "एक चीन' धोरणाच्या माध्यमामधून दबाव आणता येईल, असे वाटत असल्यास ट्रम्प हे भोळे आहेत, असे म्हणावे लागेल. प्रत्येक गोष्टीची किंमत असते; आणि तिची खरेदी-विक्री करता येते, अशी ट्रम्प यांची धारणा आहे. परंतु एक चीन धोरणाशी तडजोड होऊ शकत नाही... 

बीजिंग - अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "एक चीन' धोरणाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याची तीव्र प्रतिक्रिया चीनमध्ये उमटली आहे. तैवानबद्दल अमेरिकेचे धोरण बदलले; तर चीनकडूनही अमेरिकेच्या शत्रुंना शस्त्रास्त्रविक्रीसहित थेट मदत करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चीनकडून देण्यात आला आहे.

"ट्रम्प यांनी एक चीन धोरणात बदल करत तैवानच्या स्वातंत्र्यास सार्वजनिक पाठिंबा दर्शविला आणि तैवानला शस्त्रास्त्रविक्री केली; तर चीनलाही अमेरिकेशी भागीदारी करण्यामध्ये स्वारस्य उरणार नाही. चीनकडून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी "एक चीन' धोरणाच्या माध्यमामधून दबाव आणता येईल, असे वाटत असल्यास ट्रम्प हे भोळे आहेत, असे म्हणावे लागेल. एक चीन धोरणाशी तडजोड होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते; आणि तिची खरेदी-विक्री करता येते, अशी ट्रम्प यांची धारणा आहे. मात्र अमेरिकेच्या राज्यघटनेवर अशी किंमत लावल्यास अमेरिकन जनतेकडून राज्यघटनेची विक्री करुन सौदी अरेबिया वा सिंगापूरची राज्य व्यवस्था स्वीकारण्यात येईल काय?,'' अशी संतप्त विचारणा ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रामधून करण्यात आली आहे.

"चीनकडून व्यापार व इतर मुद्यांसंदर्भात सवलती मिळत नसतील, तर अमेरिकेकडून एक चीन धोरण कायम ठेवले जाण्याची आवश्‍यकता काय आहे? चीनकडून चलनाच्या प्रश्‍नासहित उत्तर कोरिया, दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादासंदर्भात अमेरिकेस सहकार्य केले जात नाही,'' असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हटले होते. 

Web Title: China fumes after Trump's remarks on One China Policy