काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याचे चीनचे संकेत

पीटीआय
मंगळवार, 2 मे 2017

चीन आता प्रादेशिक सत्ताकारणाच्या केंद्रस्थानी आहे. या पार्श्‍वभूमीवर, या भागात राजकीय स्थिरता कायम राखण्यासाठी प्रभावी मध्यस्थाची भूमिका करण्याचे तंत्र चीनने आत्मसात करावयास हवे

बीजिंग - काश्‍मीरप्रश्‍नी भारत व पाकिस्तान या देशांमध्ये मध्यस्थी करण्यात चीनचे हित असल्याची सूचक भूमिका ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून मांडण्यात आली आहे. चीनकडून 50 अब्ज डॉलर्स गुंतविण्यात येणाऱ्या चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये पाकव्याप्त काश्‍मीरचाही अर्थातच समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर, काश्‍मीरमधील वातावरण निवळावे, अशी अपेक्षा चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

"इतर देशांमधील वादांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण चीनकडून कायमच अंगीकारण्यात आले आहे. मात्र परदेशांत गुंतवणूक केलेल्या चिनी कंपन्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले जाईल, असा या भूमिकेचा अर्थ नक्कीच नाही. चीनची या भागामधील प्रचंड गुंतवणूक लक्षात घेता काश्‍मीरवरुन भारत व पाकिस्तानमध्ये पेटलेला वाद सुटावा, यासाठी मदत करण्यामध्ये चीनचे राष्ट्रीय हित आहे. म्यानमार व बांगलादेश या दोन देशांमध्ये रोहिंग्या मुस्लिम प्रश्‍नावरुन चीनकडून करण्यात आलेल्या मध्यस्थीमधून, चिनी सीमारेषांपलीकडील भागांमधील समस्याही सोडविण्यासंदर्भातील चीनच्या क्षमतेमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. चीन आता प्रादेशिक सत्ताकारणाच्या केंद्रस्थानी आहे. या पार्श्‍वभूमीवर, या भागात राजकीय स्थिरता कायम राखण्यासाठी प्रभावी मध्यस्थाची भूमिका करण्याचे तंत्र चीनने आत्मसात करावयास हवे. एक प्रादेशिक सत्ता म्हणून धोरण कशा राबविले जावे, यासंदर्भात अजून खूप काही शिकणे आवश्‍यक आहे. तेव्हा जम्मु काश्‍मीरप्रश्‍नी पाकिस्तान व भारतामध्ये मध्यस्थी करण्याचे आव्हान हे यासंदर्भातील चीनपुढील कदाचित सर्वांत अवघड आव्हान असेल,'' असे मत ग्लोबल टाईम्समधील एका लेखाच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे.

पाकव्याप्त काश्‍मीरचा भाग हा व्यूहात्मकदृष्टयाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागामध्ये सैन्य आणल्याचा आरोप चीनवर करण्यात आला आहे. मात्र चीनकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. या भागामधील चिनी सैन्य हे केवळ मानवतावादी (ह्युमॅनिटेरिअन) मदत करण्यासाठी आले असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता.

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये चीनचा प्रभाव वाढत असला; तरी काश्‍मीर प्रश्‍न हा भारत व पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावर सोडवावयास हवा, अशी चीनची आत्तापर्यंतची औपचारिक भूमिका आहे. काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थीचे संकेत चीनकडून इतक्‍या स्पष्टपणे प्रथमच देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Web Title: 'China has vested interest in helping resolve Kashmir issue'