चीनचा संरक्षण क्षेत्रावरील खर्च भारताच्या तिपटीहून जास्त...

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

याआधी चीनच्या संरक्षणसिद्‌धतेवर झालेला कमी खर्च भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराच्या सर्वांत खालच्या स्तरातील जवानांचे जीवनमान सुधारावे आणि लष्करी साहित्य अद्ययावत करावे, अशा दोन उद्दिष्टांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

बीजिंग - गेल्या काही वर्षांपासून हाती घेतलेली लष्कराच्या आधुनिकीकरणाची महत्त्वाकांक्षी, आक्रमक मोहिम कायम ठेवत चीनने या वर्षीच्या संरक्षणविषयक अर्थतरतुदींमध्ये तब्बल 8.1 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा निर्णय आज (सोमवार) घोषित केला.

चीनच्या संरक्षण क्षेत्रावरील खर्चासाठी सुमारे 175 अब्ज डॉलर्स इतकी वित्तीय तरतूद करण्यात आली असून ती भारताच्या संरक्षण क्षेत्रातील अर्थसंकल्पाच्या तब्बल तिपटीपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी (2017) चीनने संरक्षण क्षेत्रावरील खर्च 7 टक्‍क्‍यांनी वाढविला होता. भारताचा संरक्षण क्षेत्रावरील खर्च हा सुमारे 46 अब्ज डॉलर्स आहे.

चीन हा अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणारा दुसरा देश आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या लष्करास अत्याधुनिक बनविण्याच्या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या नौदलामध्ये सध्या एक विमानवाहु नौका आहे. याशिवाय चीनकडून आणखी दोन विमानवाहु नौका व लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात येत आहे.

""याआधी चीनच्या संरक्षणसिद्‌धतेवर झालेला कमी खर्च भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराच्या सर्वांत खालच्या स्तरातील जवानांचे जीवनमान सुधारावे आणि लष्करी साहित्य अद्ययावत करावे, अशा दोन उद्दिष्टांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,'' असे झांग येसुई या "नॅशनल पीपल्स कॉंग्रेस'च्या प्रवक्‍त्याने सांगितले.

दक्षिण चिनी समुद्रामधील चिनी नौदलाच्या आक्रमक हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china india defense budget south china sea