दहशतवादाविरोधात 'ब्रिक्स'ने नेतृत्व करावे- दोवाल; डोकलामवर चीनशी चर्चा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

डोकलाममधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोवाल यांची चीनशी चर्चा 

बीजिंग : ब्रिक्स देशांनी जागतिक दहशतवादाविरोधातील लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी व्यक्त केली. तसेच, डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर दोवाल यांनी आज चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जैची यांची भेट घेतली. 

ब्रिक्‍स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या शिखर परिषदेला शुक्रवारी बीजिंग येथे दोवाल उपस्थित होते. यावेळी दोवाल यांनी वरील मत व्यक्त केले. दोवाल हे काल (बुधवार) चीन दौऱ्यावर आले. बैठकीदरम्यान भारत आणि चीनच्या या समपदस्थ अधिकाऱ्यांनी वाढलेल्या तणावाबाबत चर्चा केली. 

दहशतवादाशी लढताना ब्रिक्स देशांनी आणखी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी. दहशतवादाला तोंड देताना ब्रिक्स देशांनी नेतृत्व दाखविण्याची, तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या ज्या
सामरिक मुद्द्यांवर आपली एकवाक्यता आहे त्यासाठी ब्रिक्सने नेतृत्वाची भूमिका बजावण्याचीही गरज आहे, असे दोवाल यांनी सांगितले. 

चीनने ही उच्चस्तरीय बैठक बोलावल्याबद्दल दोवाल यांनी चीनचे आभार मानले. तसेच, बीजिंगमध्ये येण्यास आनंद होतो, असे त्यांनी सांगितले. येथील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, यांग यांनी भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींबरोबर स्वतंत्रपणेही चर्चा केली. दोवाल यांच्याशी चर्चा करताना द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक वादाचे मुद्दे यांच्याबाबत चर्चा झाली. दोवाल आणि यांग जैची हे भारत आणि चीनमधील सीमा प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यासाठी नेमलेले विशेष प्रतिनिधीही आहेत. 

सिक्कीममधील डोकलामवरून भारत आणि चीनदरम्यान गेले जवळपास महिनाभर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोवाल यांच्या या दौऱ्यात या वादावर तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे. दोवाल हे चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग आणि इतर अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. डोकलाममध्ये चिनी सैनिकांना रस्ता बांधण्यास भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दोन्ही देशांचा एकमेकांवर आरोप आहे. भूतानचाही या भूभागावर दावा आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री
 

Web Title: china india news doklam BRICS summit nsa ajit doval