ट्रम्प यांचे चीनमध्ये शाही स्वागत

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

बीजिंग : आशिया दौऱ्यावर असलेले अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काल (ता. 8) रात्री उशिरा चीनमध्ये आगमन झाले. अत्यंत शाही थाटात ट्रम्प यांचे स्वागत झाल्यानंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाली.

बीजिंग : आशिया दौऱ्यावर असलेले अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काल (ता. 8) रात्री उशिरा चीनमध्ये आगमन झाले. अत्यंत शाही थाटात ट्रम्प यांचे स्वागत झाल्यानंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाली.

ट्रम्प यांच्या आशिया दौऱ्यात ते तीन दिवस चीनमध्ये असतील आणि हाच त्यांच्या दौऱ्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दौऱ्यात जिनपिंग यांच्याबरोबर ते उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्‍यता आहे. ट्रम्प यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या सन्मानार्थ 21 तोफांची सलामी देण्यात आली. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांचे जावई जेरेड क्रुश्‍नर हेदेखील चीन दौऱ्यावर आले आहेत. यानंतर शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीत उत्तर कोरिया आणि व्यापार या दोन मुद्यांवर प्राथमिक चर्चा झाली.

रात्रीतून धुके गायब
दिल्लीप्रमाणेच बीजिंगमध्येही चार दिवसांपासून प्रचंड धुके पडले आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनमध्ये आगमन होणार असल्याने चीन सरकारने रात्रीतून त्यावर उपाय केला आणि आकाश स्वच्छ केले. चीनच्या पेईचिंग परिसरात प्रचंड धुके पडले होते आणि बुधवारी रात्री ट्रम्प येणार होते. यावर उपाय म्हणून चीनने वाहनांवर आणि बांधकामांवर तात्पुरती बंदी घातली आणि स्टील, सिमेंट आणि कोळसा कंपन्यांना उत्पादनांना स्थगिती दिली. शेजारील शहरांमध्येही नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चीनने "अँटी स्मॉग गन'चा वापर करत पाण्याचा मारा केल्याने धुळीचे कण पाण्याबरोबर खाली आले.

Web Title: china news donald trump royal welcome in China