पाकला मालवाहतूक करण्याची चीनची मोठी योजना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

बीजिंग - पाकिस्तानला रस्ते व रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक सुरू करण्याची चीनची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चीन- पाकिस्तान दरम्यान 46 अब्ज डॉलर्स खर्चून विकसित करण्यात येत असलेल्या "इकॉनॉमिक कॉरिडॉर'मधून ही मालवाहतूक सुरू करण्याचे चीनचे नियोजन आहे. चीनची ही संभाव्य योजना भारतासाठी मात्र चिंताजनक ठरणार आहे. या "इकॉनॉमिक कॉरिडॉर'ला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.

चीनच्या "झिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ""चीनच्या गांसू प्रांतातील लांझहू येथून ही मालवाहतूक सुरू होणार असून, ती पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत थेट जाणार आहे. या रस्त्यावरून ही मालवाहतूक सुरू करण्याची योजना असल्याचे लांझहू व्यापारी पार्कचे संचालक शू चुंहुआ यांनी म्हटले आहे.'' अर्थात, ही सेवा कधी सुरू होणार आहे याची निश्‍चित माहिती यात देण्यात आलेली नाही.

शू चुंहुआ म्हणाले, ""गेल्या वर्षी मे महिन्यात लांझहू ते काठमांडू अशी रस्ते व रेल्वे मालवाहतूक सेवा सुरू झाली. याचे दक्षिण आशियायी देशांत चांगले स्वागत झाले आहे. 2016 मध्ये चीन व नेपाळमधील व्यापार तीन अब्ज युआन इतका होता. या वर्षी तो दहा अब्ज युआनपर्यंत वाढेल, अशी आशा आहे.''

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनने पाकिस्तानला "इकॉनॉमिक कॉरिडॉर'च्या माध्यमातून 50 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती. या साऱ्या वस्तू पाकव्याप्त काश्‍मीरमधून जाणाऱ्या या कॉरिडॉरमधून पाकिस्तानातील ग्वादर बंदरात पाठविण्यात आल्या होत्या. आता तेथे रस्त्याच्या जोडीला रेल्वे सेवाही सुरू करण्याची चीनची योजना आहे. झिंगआंगपर्यंत माल रेल्वेने आणण्यात येईल, नंतर तो काराकोरम पर्वतरांगांत ट्रकने वाहून नेण्यात येईल. हा माल प्रामुख्याने आफ्रिका व आखाती देशांत निर्यात केला जाईल. या संभाव्य मार्गामुळे चीनचे या देशांशी असलेले अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Web Title: china news marathi news global news pak china friendship