उत्तर कोरियाच्या मुद्याशी व्यापाराचा संबंध नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

उत्तर कोरियाच्या अण्विक कार्यक्रमाचा मुद्दा आणि अमेरिका - चीन व्यापार हे दोन स्वतंत्र विषय आहेत. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे दोन्ही विषयांवर एकत्र चर्चा करता येणार नाही

बीजिंग - अमेरिका - चीन द्विपक्षीय व्यापार आणि उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमासंबंधित चर्चा या दोन स्वतंत्र गोष्टी असून, त्यांची सरमिसळ करू नका, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेबरोबरील व्यापारातून मोठ्या प्रमाणात फायदा होत असला तरी उत्तर कोरियाच्या विरोधात चीनने कुठलीही कारवाई केलेली नाही, असे आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांचा हा आरोप चीनला चांगलाच झोंबला असून, त्याला आज चीनकडून प्रत्यूत्तर देण्यात आले.

चीनचे व्यापार उपमंत्री किआन केमींग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, उत्तर कोरियाच्या अण्विक कार्यक्रमाचा मुद्दा आणि अमेरिका - चीन व्यापार हे दोन स्वतंत्र विषय आहेत. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे दोन्ही विषयांवर एकत्र चर्चा करता येणार नाही. अमेरिका - चीन व्यापारातून दोन्ही देशांनी मोठा फायदा मिळवला आहे.

उत्तर कोरियाने दुसऱ्यांदा आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी या प्रकरणी चीनवर कठोर शब्दांत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर चीनकडून वरील प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर कोरियाचा सर्वाधिक व्यापार हा चीनबरोबर असतो. तसेच, उत्तर कोरियाचे चीनबरोबरचे राजनैतिक संबंध चांगले आहेत.

Web Title: china north korea donald trump