चीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध 

पीटीआय
रविवार, 24 सप्टेंबर 2017

उत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश चीन असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी 90 टक्के व्यापार चीनशी होतो. चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे.

बीजिंग(पीटीआय) : उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय चीनने घेतला आहे; तसेच उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. अणुचाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरून दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे. 

उत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश चीन असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी 90 टक्के व्यापार चीनशी होतो. चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे. उत्तर कोरियाने अणुचाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत. चीन हा उत्तर कोरियाचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियाला मोठा फटका बसणार आहे. 

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार द्रवरूप नैसर्गिक वायूची उत्तर कोरियाला होणारी निर्यात आजपासून थांबविण्यात आली; तसेच कच्च्या तेलाची आयात 1 ऑक्‍टोबरपासून मर्यादित करण्यात येईल. उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवरील बंदी आजपासून लागू होईल. 

संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांकडून उत्तर कोरियाला होणारी कच्च्या तेलाची निर्यात मर्यादित करण्यात आली आहे. ही निर्यात ऑक्‍टोबरपासून चालू वर्षअखेरपर्यंत पाच लाख बॅरल असेल आणि पुढील वर्षीपासून ती दर वर्षाला 20 लाख बॅरल असेल. उत्तर कोरियाने याचा वापर फक्त नागरी कामकाजासाठी करावा, अशीही अट घालण्यात आली आहे. 

आर्थिक नाकेबंदी होणार 
जागतिक दबावामुळे चीनने उत्तर कोरियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. याचबरोर उत्तर कोरियाचे चीनमधील बॅंकांमार्फत होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहारही थांबणार आहेत. या निर्णयामुळे उत्तर कोरियाची आर्थिक नाकेबंदी होणार आहे. चीनने बॅंकांना उत्तर कोरियाशी व्यावसायिक संबंध तोडण्याचे निर्देश दिले होते. याचे स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. 

Web Title: china north korea oil export

टॅग्स