"मसूद अझहर व पाक'ची चीनकडून पुन्हा पाठराखण

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

चीनने या बंदीस सध्या विरोध (होल्ड) दर्शविल्याने आता हे प्रकरण आणखी सहा महिने लांबणीवर पडले आहे. ही कालमर्यादा आणखी तीन महिन्यांनी वाढविता येणे शक्‍य आहे

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आज (मंगळवार) अमेरिकेकडून पाकिस्तानमधील "जैश इ मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा कुप्रसिद्ध म्होरक्‍या मसूद अझहर यास "जागतिक दहशतवादी' घोषित करुन त्याच्यावर बंदी लादण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र चीनने पुन्हा एकदा या प्रस्तावामध्ये खोडा घातल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

याआधीही, गेल्या डिसेंबर महिन्यात पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार असलेल्या अझहर याच्यावर बंदी लादण्यासंदर्भातील मांडण्यात आलेल्या प्रस्तावास चीनकडून विरोध करण्यात आला होता. अमेरिकेने या प्रकरणी मांडलेल्या प्रस्तावास ब्रिटन व फ्रान्स या देशांनीही पाठिंबा दर्शविला होता. भारत व अमेरिकेमध्ये झालेल्या "चर्चे'नंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु चीनने या बंदीस सध्या विरोध (होल्ड) दर्शविल्याने आता हे प्रकरण आणखी सहा महिने लांबणीवर पडले आहे. ही कालमर्यादा आणखी तीन महिन्यांनी वाढविता येणे शक्‍य आहे. तसेच हा प्रस्ताव पूर्णत: निकालात (ब्लॉक) काढणेही शक्‍य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

हा प्रस्ताव संमत झाल्यास अझहर याच्यावर प्रवासाच्या बंदीबरोबरच त्याची मालमत्ताही गोठविण्यात यश येईल. चीनच्या आडमुठ्या धोरणामुळे या प्रकरणी अद्यापी भारतास पूर्ण राजनैतिक यश आलेले नाही. मात्र अझहर व पर्यायाने पाकिस्तानची पाठराखण करण्याच्या चीनच्या निर्णयामुळे या देशाचे दहशतवादासंदर्भातील धोरण दुटप्पी असल्याचे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

Web Title: China opposes banning Pak-based JeM chief Masood Azhar, again