चीनमध्ये लोक चेहरा दाखवतात, अन...करतात हवी ती शॉपिंग

सोमवार, 9 सप्टेंबर 2019

चीनने फेशियल पेमेंट सिस्टीम स्वीकारली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहक केवळ आपला चेहरा दाखवून हव्या त्या वस्तूंची खरेदी करतात.

नवी दिल्ली : चीनमधील ग्राहक आपल्याकडे पॉकेट, एटीएम कार्ड, इतकेच नाही तर स्मार्टफोन नसतानाही शॉपिंग करत आहेत. हे ग्राहक केवळ आपला चेहरा दाखवून हव्या त्या वस्तूंची खरेदी करतात. होय, हे अगदी खरं आहे! कारण, चीनने फेशियल पेमेंट सिस्टीम स्वीकारली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना आपला चेहरा स्कॅन करुन, हवी ती शॉपिंग करता येते. या तंत्रज्ञानामुळे आता क्यूआर कोड प्रणालीही कालबाह्य वाटू लागली आहे.

असे काम करते हे तंत्रज्ञान
खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कॅमेरा असलेल्या प्वाइंट ऑफ सेल मशीनच्या समोर उभे राहावे लागते. ही मशीन ग्राहकांचा चेहरा स्कॅन करून, त्या व्यक्तीच्या डिजिटल पेमेंट प्रणाली किंवा बँक खात्यातून खरेदीइतके पेमेंट विक्रेत्यांच्या खात्यात जमा करते. त्यासाठी ग्राहकांना आपला चेहरा त्यांच्या बँक खात्याशी लिंक करावा लागतो. ही पेमेंट प्रणाली संपूर्ण चीनमध्ये लागू करण्यात आली आहे.

या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर
या प्रणालीच्या वापराबाबत लोकांच्या मनात डेटा चोरी, आणि गोपनीयतेचा भंग होणे. यांसारख्या गोष्टींची भीती आहे. मात्र, तरी देखील चीनमध्ये लोक या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. चीनची नामांकित ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे फाइनेंशियल आर्म अलीपे देखील या पेमेंट प्रणालीच्या वापरात अग्रेसर आहे. चीनच्या जवळपास १०० शहरांमध्ये अलीपेची ही फेशियल रिकॉग्निशन प्रणाली वापरण्यात येत आहे. याशिवाय ही प्रणाली लागू करण्यासाठी अलीपे पुढील तीन वर्षात जवळपास ४२ कोटी डॉलर (भारतीय रुपयात ७ अब्ज १५ कोटी १९ लाख रुपये) खर्च करणार आहे.