अखेर चीनची माघार! कोरोनाचा स्त्रोत शोधण्यात सहकार्य करणार, पण...

China, COVID 19
China, COVID 19

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस, हाँगकाँगची स्वायतत्ता आणि अन्य मुद्दांवरुन चीन व अमेरिकेमधील तणाव वाढत असतानाच चीन- अमेरिका संबंधांवरुन अमेरिका एका नव्या शीत युद्धाच्या तयारीत असल्याचा आरोप चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी रविवारी केला. चीनी संसदेच्या वार्षिक अधिवेशनानिमित्त आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अमेरिका आणि चीनमधील संबंधाच्या आडून अमेरिकेतील काही राजकीय शक्ती दोन्ही देशांना नव्या शीत युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवत आहे, असे आमच्या निर्दशनास आले आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रयत्न अत्यंत धोकादायक आहे. 

अमेरिका व चीनमध्ये वेगवेगळी सामाजिक व्यवस्था आहे. यातून चीनी जनतेसमोर जे विविध पर्याय आहेत, त्याचा आदर सर्वांनी करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच दोन्ही देशांमध्ये अनेक मतभेद आहेत, पण यामुळे परस्पर सहकार्यावर बिलकुल परिणाम होणार नाही, अशी भूमिकाही वँग यांनी मांडली. चीनच्या हिताला बाधा आणणे, चीन-अमेरिका संबंध कमी लेखत चीनमधील अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणे अमेरिकेने थांबवावे, असा सज्जड इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी शनिवारी (ता. २३) अमेरिकेला दिला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबतचे नवे धोरण अमेरिकी काँग्रेसमध्ये नुकतेच मांडले होते. झाओ यांचे विधान हे या धोरणाला उत्तर असल्याचे मानले जात आहे. व्यापार, मानव अधिकार आणि अन्य काही मुद्दांवर चीन व अमेरिका या दोन महाशक्तींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असून कोरोनाव्हायरमुळे त्यात आणखी भर पडली आहे. 

कोरोनाचा स्त्रोत शोधण्यासाठी सहकार्य संपूर्ण जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूंचा उगम चीनमध्ये झाला असल्याचा आरोप अमेरिकेसह अन्य देश वारंवार करीत असले तरी चीनने ते प्रत्येक वेळी ठामपणे फेटाळून लावले आहेत. आज मात्र चीनने एक पाऊल मागे घेतल्याचे दिसले. कोरोनाचा स्त्रोत शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करण्यास चीन तयार असल्याचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी आज स्पष्ट केले. मात्र कोणताही तपास हा राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com