चीनमध्ये आढळला नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये आढळला होता.

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाव व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. याबाबतची माहिती रॉयटर्सने दिली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये आढळला होता. त्यानंतर आता या नव्या स्ट्रेनचे रुग्ण जगभरात सगळीकडे आढळून येत आहेत.

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्यानंतर संशोधक आणि जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ब्रिटनने देखील नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे  आवाहन केले आहे. गुरुवरी इंग्लंडच्या लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

हेही वाचा - Breaking : WHO कडून Pfizer-BioNTech लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी

अनेक देशांत सध्या कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी लशीकरणाची मोहिम सुरु आहे. यादरम्यान चीनने देखील आनंदाची बातमी दिली आहे. गुरुवारी चीनची सरकारी कंपनी 'सिनोफार्म' द्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना लशीला सशर्त मंजूरी दिली आहे. चीनची ही पहिलीच लस आहे जी सामान्य लोकांसाठी आहे. चीनमध्ये आतापर्यंत चार लशींच्या वापराला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स/सिनोफार्मची पहिली लस आहे. इतर लशींमध्ये सिनोवॅक, वुहान इंस्टिट्यूटची लस, कॅनसिनो बायोलॉजिकल इंकची लस सामिल आहे. 

हेही वाचा - अमेरिकेत चोवीस तासात कोरोनाचे ३,७०० बळी

जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी फायझर-बायोनटेक (Pfizer-BioNTech) लशीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.  याआधी ब्रिटनने 8 डिसेंबर रोजी या लशीला मान्यता देऊन लशीकरणाची मोहीम सुरु केली आहे. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपियन युरोपिअन देशांनीही या लशीला मान्यता दिली आहे. गेल्या एका वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील पहिली लस म्हणून आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China reports the first case of the new corona virus strain