चीनचे धोरण "आक्रमक, बळजबरी'चे: सीआयए संचालक

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

आशिया प्रशांत भागामध्ये अमेरिकेच्या प्रभावाची बरोबरी करणे, इतकीच चिनी महत्त्वाकांक्षेची मर्यादा नाही. ही केवळ आर्थिक बरोबरीची स्पर्धा नाही. चीनची महत्त्वाकांक्षा ही व्यूहात्मक आहे. त्यांना अमेरिकेबरोबर सर्व क्षेत्रांत स्पर्धा करावयाची आहे

वॉशिंग्टन - आशिया-प्रशांत महासागर भागात राजनैतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनकडून सातत्याने "अधिकाधिक आक्रमक, बळजबरीचे' धोरण राबविण्यात येत असल्याचे निरीक्षण सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे सहाय्यक संचालक मायकेल कॉलिन्स यांनी नोंदविले आहे. दक्षिण चिनी समुद्रामध्ये चिनी नौदलाकडून सातत्याने दाखविण्यात येत असलेल्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर कॉलिन्स यांनी व्यक्त केलेले हे मत अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.

दक्षिण चिनी समुद्राच्या 90% पेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितल्याने दक्षिण पूर्व आशियातील इतर देश (आसियान) व चीनमधील वातावरण अधिकाधिक तणावपूर्ण होत आहे. दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून कृत्रिम बेटे तयार करण्यात आली आहेत. चिनी नौदल व सैन्याचा मोठा वावर असलेल्या या बेटांमुळे या भागामधील इतर देशांना "असुरक्षित' वाटू लागले आहे.

"आशिया प्रशांत भागामध्ये अमेरिकेच्या प्रभावाची बरोबरी करणे, इतकीच चिनी महत्त्वाकांक्षेची मर्यादा नाही. ही केवळ आर्थिक बरोबरीची स्पर्धा नाही. चीनची महत्त्वाकांक्षा ही व्यूहात्मक आहे. त्यांना अमेरिकेबरोबर सर्व क्षेत्रांत स्पर्धा करावयाची आहे,'' असे कॉलिन्स म्हणाले. कॉलिन्स यांनी यावेळी डोकलाम वादचा उल्लेख केला नाही. मात्र चीनचे परराष्ट्र धोरण अधिकाधिक आक्रमक होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे दक्षिण चिनी समुद्रासहच हिमालय प्रदेशातही चीनकडून दाखविण्यात येत असलेली आक्रमकता जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: China resorting to 'coercive practices' to achieve goals: CIA