चीन अमेरिकेचे "ड्रोन' परत करणार?

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर यासंदर्भात "चोरी'चा आरोप केला आहे. ""अमेरिकेस चीनकडून चोरण्यात आलेले ड्रोन पुन्हा नको. ते त्यांच्याचकडे राहु दे, असे आपण त्यांना सांगावयास हवे,'' अशा आशयाचे ट्‌विट ट्रम्प यांनी केले आहे.

वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून पकडण्यात आलेले "ड्रोन' विमान अमेरिकेस परत केले जाईल, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. यासंदर्भात चीनशी "आश्‍वासक चर्चा' झाल्याची माहिती यावेळी पॅंटॅगॉनकडून देण्यात आली.

चीनकडून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये हे विमान गेल्या गुरुवारी पकडण्यात आले होते. या कृतीमागील कारण चीनकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. याशिवाय या घटनेचे अमेरिकेकडून "भांडवल' करण्यात येत असल्याचा आरोपही चीनने केला आहे.

अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर यासंदर्भात "चोरी'चा आरोप केला आहे. ""अमेरिकेस चीनकडून चोरण्यात आलेले ड्रोन पुन्हा नको. ते त्यांच्याचकडे राहु दे, असे आपण त्यांना सांगावयास हवे,'' अशा आशयाचे ट्‌विट ट्रम्प यांनी केले आहे. चीनच्या या कृतीने नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे.

हे ड्रोन विमान पाण्याखाली शास्त्रीय संशोधन करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा दावा करत ते त्वरित परत करण्याची मागणी पेंटॅगॉनने केली आहे. याशिवाय, भविष्यात पुन्हा अशी कृती न करण्याचा इशाराही अमेरिकेकडून चीनला देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर, दोन देशांमध्ये यासंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ड्रोन परत देण्याच्या वृत्तास चीनकडून दुजोरा देण्यात आला असला; तरी ते कधी दिले जाईल, याबद्दल मात्र अद्याप संदिग्धता आहे. चीनने हे ड्रोन विमान फिलीपीन्सच्या किनारपट्टीजवळ पकडले होते.

Web Title: China to return seized US underwater drone