आमच्या अंतर्गत मुद्यात नाक खुपसू नका, चीनचा अमेरिकेला टोला

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 मे 2020

कोरोनाजन्य परिस्थितीनंतर चीन-अमेरिका यांच्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला चीनला जबाबदार धरल्यानंतर 25 वर्षांपूर्वींचा मुद्दा उकरुन काढत तिबेटच्या बौद्ध धर्मगुरुंच्या मुद्यावरुन अमेरिकेने चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या मुद्यावरुन चीनने अमेरिकेला टोला लगावला आहे.

कोरोनाजन्य परिस्थितीनंतर चीन-अमेरिका यांच्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला चीनला जबाबदार धरल्यानंतर 25 वर्षांपूर्वींचा मुद्दा उकरुन काढत तिबेटच्या बौद्ध धर्मगुरुंच्या मुद्यावरुन अमेरिकेने चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तिबेटचे 11 वे बौद्ध धर्म गुरु पंचेन लामा यांची सुटका करा, अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली होती. यावर आता चीनने प्रतिक्रिया दिली आहे. पंचेन लामा सामान्य आयुष्य जगत आहेत. कोणी बाहेरच्यांनी आपल्या जीवनात ढवळाढवळ करावी, असे त्यांना अजिबात वाटत नाही, अशा शब्दांत चीनने पंचेन लामा यांच्या मुद्यावरुन अमेरिकेवर शाब्दिक वार केलाय.

कोरोनाच्या लसीबाबत महत्त्वाची बातमी...

25 वर्षांपासून गायब असलेले पंचेन लामा कुठे आहेत? असा सवाल उपस्थितीत करत त्यांच्यासंदर्भातील माहिती खुली करावी, असे अमेरिकेने म्हटले होते. तिब्बेटचे गेधुन चोइक्यी न्यिमा यांना 1995 मध्ये 11वे पंचेन लामा म्हणून घोषीत करण्यात आले होते. दलाई लामा यांच्यानंतर बौद्ध धर्माशी जोडलेले पंचने लामा हे दुसऱ्या स्थानावरील अध्यात्मिक पद आहे. वयाच्या सहाव्या वर्षी गेधुन चोइक्यी न्यिमा यांचे कुटुंबियासंह अपहरण करण्यात आले होते. मानवाधिकार संघटनेने या घटनेचे वर्णन जगातील सर्वात कमी वयातील राजकीय कैदी असा केला होता.   

अमेरिका-चीन यांच्यात पुन्हा तणाव; कारण वाचा सविस्तर

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी पंचेन लामा यांचा मुद्दा उपस्थितीत करत चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. इतर समुदायाप्रमाणे तिबेटमधील बौद्ध धर्मियांना देखील पंरपरेनुसार आपला नेता निवडणे,  शिक्षण घेणे आणि सन्मानित करण्याचा अधिकार आहे. यात सरकारने कोणताही हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे म्हणत चीनवर निशाणा साधला होता.  
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजिआन म्हणाले की,  गेधुन चोइक्यी न्यिमा यांनी अनिवार्य शिक्षणच नव्हे तर पदवीचे शिक्षणही घेतले आहे. बाहेरच्या लोकांनी आयुष्यात हस्तक्षेप करु नये अशीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे, असे सांगत आमच्या अंतर्गत मुद्यामध्ये हस्तक्षेप करु नका,  असा टोला अमेरिकेला लगावला आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china says buddhist leader panchen lama leading normal life