चीनच्या संतापामुळे पाकिस्तानची पाचावर धारण!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामधील विविध प्रकल्पांच्या निर्मितीकरता शेकडो चिनी नागरिक राहत असून या नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हान अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. याआधीच जागतिक समुदायाच्या नाराजीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला चीनला दुखाविणे परवडणार नसल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली - कझाकस्तानची राजधानी असलेल्या अस्ताना येथे नुकत्याच झालेल्या "शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या संघटनेच्या परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबरोबरील प्रस्तावित बैठक धुडकावून लावल्यामुळे भेदरलेल्या पाकिस्तानकडून चीनची मर्जी पुन्हा संपादन करण्यासाठी सर्व राजनैतिक प्रयत्न करण्यात येत आहेत.

या परिषदेच्या काही दिवस आधीच बलुचिस्तान या पाकिस्तानी प्रांतामधून दोन चिनी नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर या दोघांना ठार करण्यात आल्याचा दावा इस्लामिक स्टेट ((इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला होता. सध्या पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामधील विविध प्रकल्पांच्या निर्मितीकरता शेकडो चिनी नागरिक राहत असून या नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हान अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.

या चिनी नागरिकांच्या हत्येचा चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्राशी संबंध नसल्याचा दावा चीनकडून करण्यात आला असला; तरी अस्ताना येथे शरीफ यांना भेटण्यास शी यांच्याकडून देण्यात आलेला नकार सूचक असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अस्ताना येथील या प्रकारानंतर पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्ख्वां या प्रांतामधील परदेशी नागरिकांच्या संरक्षणासाठी येथे 4200 मनुष्यबळ असलेले सशक्त सुरक्षा दल उभे करण्याची घोषणा येथील प्रादेशिक सरकारकडून करण्यात आली आहे. याचबरोबर, या भागामध्ये कार्यरत असलेल्या चिनी नागरिकांची सर्व माहितीही सुरक्षेस्तव मिळविण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या इतर प्रांतांमध्येही चिनी नागरिकांच्या सुरक्षेस्तव तत्काळ पाऊले उचलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याआधीच जागतिक समुदायाच्या नाराजीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला चीनला दुखाविणे परवडणार नसल्याचे मानले जात आहे.

Web Title: China snubs Pakistan at SCO