चीनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार; 16 हजार इस्लामिक मशिदी पाडल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 26 September 2020

चीन शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लीमांवर अत्याचार करत असल्याच्या माहिती जगासमोर आली आहे.

बिजिंग- चीन शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लीमांवर अत्याचार करत असल्याच्या माहिती जगासमोर आली आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, चीनची कम्युनिस्ट पार्टी उइगर मुस्लिमांची संस्कृती आणि त्यांचा इतिहास नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलत आहे. शिनजियांग डेटा प्रॉजेक्टमध्ये चीनचा चेहरा उघडा पडला आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, शिनजियांग प्रांतातील 16 हजार मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्यात किंवा त्यांचे घुमट पाडण्यात आले आहेत. शिनजियांगमधील सांस्कृतिक महत्व असणाऱ्या 1 हजार स्थळांवर नजर टाकल्यास यातील अनेक क्षेत्रे नष्ट झाल्याचे पाहायला मिळतील.

बंदीनंतरही चिनी ऍप भारतात नव्या अवतारात; डाऊनलोड कोटींत

उइगरांना त्यांच्या इतिहासापासून दूर करण्याची योजना

रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय की, 2017 मध्ये झालेल्या कारवाईत 10 लाख उइगरांना ताब्यात घेण्यात आले. जेणेकरुन त्यांची संस्कृती आणि ओळख मिटवता येईल. याला सांस्कृतिक नरसंहाराचे नाव देण्यात आले आहे. यात उइगर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांना पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. त्यांची संस्कृती मिटवण्याची योजना जाणूनबुजून करण्यात आलेली कृती असल्याचे मत काही उइगरांनी व्यक्त केलंय. उइगरांना त्यांच्या इतिहासापासून दूर करण्याची चीनची योजना आहे. रिपोर्टनुसार, 2016 मध्ये डेप्युटी सेक्रेटरीने उइगरांना मार्गदर्शन न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांची संस्कृती बदला, त्यांच्या परंपरा आणि रुढी बंद करुन टाका असं डेप्युटी सेक्रेटरीने सरकारी संस्थांना सांगितलं होतं.  

अधिकाऱ्याचा मशिदी पाडण्याचा सल्ला

अक्सूमध्ये कमीतकमी 400 दफनभूमींना नष्ट करण्यात आले असून त्याजागी दुसरं काहीतरी बांधकाम करण्यात आलंय. 2015 मध्ये कम्युनिस्ट पार्टीतील एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं की, शिनजियांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक मशिदी आहेत. अधिकाऱ्याने मशिदी पाडण्याचा सल्ला दिला होता. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, 8500 पेक्षा अधिक मशिदी पाडण्यात आल्या आहेत. शिनजियांगमध्ये ज्या थोड्या बहूत मशिदी आहेत, तेथेही लोक भीतीमुळे प्रार्थना करण्यासाठी जात नाहीत. 

केवळ मशिदीच नाही, तर अन्य प्रकारच्या सांस्कृतिक स्थळांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. संरक्षित असणाऱ्या 50 टक्के क्षेत्रांनाही पाडण्यात आले आहे. 2017 मध्ये सरकारने 20 किलोमीटरच्या भागात बुलडोझर फिरवून सर्व काही सपाट केलं होतं. येथील लोकांना निर्वासित करण्यात आलं. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, 284 समाधी स्थळांपैकी 165 स्थळांना पाडण्यात आलंय किंवा त्यांचे नुकसान करण्यात आले आहे. 

कोरोना लस : 80 हजार कोटी उपलब्ध होतील का? आदर पुनावालांचा प्रश्न

1500 वर्षांपूर्वीची मशिद पाडली!

कारगिलिकची ग्रँड मशिद जवळपास 1000 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. इस्लामिक आर्किटेक्चरचा अविष्कार म्हणून याकडे पाहिलं जायचं. याला सरकारी हॅरिटेज प्रोटेक्शननुसार संरक्षित करण्यात आलं होतं. मात्र, 2018 मध्ये या मशिदीचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. शिवाय याच्या बाहेर नोटीस लावण्यात आलीय की पार्टीचा सदस्य, विद्यार्थी किंवा सरकारी कर्मचारी येथे प्रार्थना करु शकत नाही. मशिदीच्या एका भागात मॉल बनवण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. 

अनेक ठिकाणी इस्लामिक रचना तोडून त्याठिकाणी छोटीशी रचना निर्माण करण्याचे कामही शिनजियांग प्रांतात करण्यात आले आहे. धार्मिकता बाळगणे चीनमध्ये बेकायदेशीर आहे. शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लिमांची संस्कृती नष्ट करण्यासाठी चीन सरकारकडून सर्व तऱ्हेने प्रयत्न होत आहेत. अनेक लोकांना येथून गायब करण्यात आले आहेत. अनेक उइगरांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china tries to erase islamic culture in xinjiang by attacking mosques and religious sites