अमेरिकेला आमच्याशी युद्धच करावे लागेल: चीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीन यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांत सतत संघर्ष दिसून आला आहे. चीनचा हा नवा इशारा याच संघर्षाचा पुढील अध्याय असल्याचे मानले जात आहे

बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांवर नियंत्रण मिळविण्यापासून चीनला रोखावयाचे असल्याचे अमेरिकेस चीनबरोबर युद्धच करावे लागेल, असा थेट इशारा येथील सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्स या प्रभावी वृत्तपत्रामधून देण्यात आला आहे.

दक्षिण चिनी समुद्रामधील बेटे चीनला गिळंकृत करुन दिली जाणार नाहीत, असे विधान अमेरिकेचे होणारे परराष्ट्र मंत्री रेक्‍स टिलेर्सन यांनी नुकतेच केले होते. अमेरिकन सिनेटमधील परराष्ट्र संबंध समितीसमोर बोलताना टिलेर्सन यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली होती. या पार्श्‍वभूमीवर संतप्त चीनकडून ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीआला आहे.

अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीन यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांत सतत संघर्ष दिसून आला आहे. चीनचा हा नवा इशारा याच संघर्षाचा पुढील अध्याय असल्याचे मानले जात आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांवर नियंत्रण मिळविण्यापासून चीनला रोखावयाची इच्छा असल्यास त्यासाठी अमेरिकेस चीनशी सर्वंकष युद्ध करावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सच्या अग्रलेखामधून देण्यात आला आहे. याचबरोबर, या लेखाचा चिनी भाषेतील अनुवादही वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरुन प्रकाशित करण्यात आला आहे.

जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील स्थान लाभलेल्या; तसेच नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असल्याचे मानले जात असलेल्या दक्षिण चिनी समुद्राच्या 90% पेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितला आहे. यामुळे दक्षिण पूर्व आशियामधील इतर देश व चीनमध्ये राजनैतिक संघर्ष निर्माण झाला आहे. या देशांना अमेरिकेचा ठाम पाठिंबा असल्याचे मानले जात आहे.
 

Web Title: China warns USA again