'ग्वदार'मधून पहिल्या चिनी नौकेस हिरवा कंदिल

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

चीनचे आर्थिक पाठबळ लाभलेल्या ग्वदार बंदराचा वापर करण्यास इच्छुक असलेल्या परकीय गुंतवणुकदारांना शक्‍य तितकी उत्तम सुरक्षा पुरविण्याचे आश्‍वासन पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले आहे. याचबरोबर, येथे काम करणाऱ्या परकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात व्यक्‍त करण्यात आलेल्या चिंतेच्या पार्श्‍वभूमीवरही पाकिस्तानने एका विशेष सुरक्षा दलाची निर्मिती केली आहे.

इस्लामाबाद - नव्याने बांधणी करण्यात आलेल्या ग्वदार बंदरामधून पश्‍चिम आशिया व आफ्रिकेसाठी व्यापारी माल घेऊन जाणाऱ्या चिनी जहाजास हिरवा कंदिल दाखवित पाकिस्तानमधील उच्चस्तरीय नागरी व लष्करी नेतृत्वाने आज (रविवार) पाकिस्तानच्या या व्यूहात्मकदृष्ट्‌या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बंदरापासून नव्या जागतिक व्यापारी सागरी मार्गाची घोषणा केली.

व्यापारी माल घेऊन जाणाऱ्या चिनी ट्रक्‍सचा पहिला ताफा कडेकोट बंदोबस्तात पाकमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. चीनचे आर्थिक पाठबळ लाभलेल्या ग्वदार बंदराचा वापर करण्यास इच्छुक असलेल्या परकीय गुंतवणुकदारांना शक्‍य तितकी उत्तम सुरक्षा पुरविण्याचे आश्‍वासन पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले आहे. याचबरोबर, येथे काम करणाऱ्या परकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात व्यक्‍त करण्यात आलेल्या चिंतेच्या पार्श्‍वभूमीवरही पाकिस्तानने एका विशेष सुरक्षा दलाची निर्मिती केली आहे. पाकिस्तानी सैन्याशी युद्धमान अवस्थेत असलेल्या अशांत बलुचिस्तान प्रांतामध्ये ग्वदार बंदर वसलेले आहे. तेव्हा बंदराची सुरक्षा व प्रादेशिक स्थिरता हे पाकिस्तानपुढील मोठे आव्हान मानले जात आहे.

नुकताच या प्रांतामध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुमारे 50 जण मृत्युमुखी पडले होते. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. चीन पाकिस्तान विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत चीन या भागामध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनच्या एकंदर पश्‍चिम आशियाविषयक धोरणाच्या दृष्टिकोनामधून हे बंदर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या क्षेत्रामध्ये चीनकडून केली जाणारी एकूण गुंतवणूक सुमारे 46 अब्ज डॉलर्सपर्यंत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Chinese ship opens new trade route via Gwadar