घोडचूक करु नका: सीआयएचा ट्रम्पना इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

ब्रेनन यांनी या मुलाखतीदरम्यान नव्या प्रशासनाने "शिस्त व शहाणपणा'ने वागणे आवश्‍यक असलेल्या काही विषयांचा उल्लेख केला. यामध्ये दहशतवादासंदर्भात वापरली जाणारी भाषा, रशियाबरोबरील संबंध, इराण आण्विक करार आणि खुद्द सीआयएच्या नव्या प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या वापराचा समावेश  त्यांनी केला आहे

वॉशिंग्टन - इराणबरोबर करण्यात आलेला आण्विक करार रद्द करणे ही घोडचूक ठरेल, असा इशारा अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. याचबरोबर, एका मुलाखतीमध्ये बोलताना ब्रेनन यांनी सीरियामधील अमेरिकेस सामना कराव्या अडचणींसाठी रशियास दोषी ठरवित रशियाकडून दिल्या जात असलेल्या आश्‍वासनांसंदर्भात नव्या राष्ट्राध्यक्षांनी सावध रहावे, असे मतही व्यक्त केले.

अध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी रशियाबरोबर अधिक सहकार्याची आवश्‍यकता असल्याची भूमिका व्यक्त करत इराणबरोबरील आण्विक करार रद्द करण्याचे आश्‍वासनही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, सीआयए संचालकांनी हा इशारा दिला आहे.

ब्रेनन यांनी या मुलाखतीदरम्यान नव्या प्रशासनाने "शिस्त व शहाणपणा'ने वागणे आवश्‍यक असलेल्या काही विषयांचा उल्लेख केला. यामध्ये दहशतवादासंदर्भात वापरली जाणारी भाषा, रशियाबरोबरील संबंध, इराण आण्विक करार आणि खुद्द सीआयएच्या नव्या प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या वापराचा समावेश ब्रेनन त्यांनी केला आहे. इराणबरोबरील आण्विक करार व सीरियाबरोबरच एकंदर मध्य पूर्वेत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राबविलेले धोरण अनेक वेळा रिपब्लिकन नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. या पार्श्‍वभूमीवर सीआयए संचालकांकडून देण्यात आलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

सीआयएचे संचालक म्हणून कॉंग्रेस सदस्य माईक पॉंपेओ यांना नियुक्त करण्याचे संकेत ट्रम्प यांनी याआधीच दिले आहेत.

Web Title: CIA warns President Elect...