श्रीलंकेत 'ब्लॅक संडे'; आठ स्फोटांत 200 जणांचा मृत्यू 

colombo
colombo

कोलंबो : जगभरात ईस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना श्रीलंकेत ख्रिश्‍चनांना लक्ष्य करून केलेल्या आठ बॉंब हल्ल्यांनी हा देश हादरून गेला. सकाळी 8.45 च्या सुमारास तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यांमध्ये 200 जणांचा मृत्यू झाला, तर दुपारी आणखी दोन बॉंबस्फोटांमध्ये आणखी पाच जणांचे प्राण गेले. या स्फोटांमुळे "एलटीटीई'च्या पतनानंतर गेले श्रीलंकेत गेले दशकभर असलेली शांतता भंग पावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. 

ईस्टर संडेनिमित्त भाविकांनी सकाळी विविध चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी केली असताना कोलंबोमधील सेंट अँटोनी चर्च, नेगोम्बो गावातील सेंट सेबॅस्टिअन चर्च आणि बॅटिकालोआ येथील एका चर्चमध्ये, तसेच कोलंबोमधील शांग्री-ला, सिनेमॉन ग्रॅंड आणि किंग्जबरी या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकाच वेळी बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 200 नागरिकांचा मृत्यू झाला, तर पाचशेहून अधिक नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये चीन, अमेरिका, ब्रिटनसह काही इतर देशांमधील 11 हून अधिक नागरिकांचाही समावेश आहे. जखमींमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, मोरोक्को आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. 

सकाळच्या या स्फोटांमुळे येथील जनता आणि सरकार हादरले असतानाच कोलंबो प्राणिसंग्रहालयासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये सातवा स्फोट होऊन त्यात दोघांचा मृत्यू झाला. स्फोटप्रकरणी कोलंबोमधील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये तपास सुरु असताना तेथे लपलेल्या हल्लेखोराने आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याने त्यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हॉटेल सिनेमॉन ग्रॅंडमधील स्फोटही आत्मघातकी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. स्फोटांमधील जखमींना विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. श्रीलंकेसह जगालाही हादरविणाऱ्या या स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने अथवा व्यक्तीने स्वीकारलेली नाही. 

शांततेचे आवाहन 
श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, आपल्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या अनपेक्षित घटनेमुळे मला धक्का बसला असून, हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी सर्व आवश्‍यक ती कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा दलांना दिले आहेत, असे सीरिसेना यांनी सांगितले. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही या "भ्याड हल्ल्याचा' निषेध केला आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शासन करण्याचा निर्धारही श्रीलंकेतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

परिस्थितीवर लक्ष 
श्रीलंकेतील परिस्थितीवर आमचे काटेकोर लक्ष असल्याचे येथील भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. श्रीलंकेतील भारतीय नागरिकांना मदतीसाठी अथवा इतर माहितीसाठी उच्चायुक्तालयाने दूरध्वनी क्रमांकही जारी केले आहेत. 

हल्ल्यानंतरच्या घडामोडी 
- सरकारकडून आज (रविवारी) संध्याकाळी 6 पासून उद्या पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू. 
- श्रीलंका सरकारकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक. 
- सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या, रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द 
- सोमवार, मंगळवारी सरकारी शाळा बंद 

हा अत्यंत थंड डोक्‍याने, पूर्वनियोजन करून केलेला रानटी हल्ला होता. या हल्ल्यांमुळे दहशतवाद हाच मानवतेपुढील सर्वांत मोठा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे. या हल्ल्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. या कठीण प्रसंगी आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी आहोत. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

ईस्टरच्या दिवशी ख्रिस्ती नागरिकांचे झालेले हत्याकांड ही अत्यंत क्रूर हिंसा आहे. सर्व शक्तीमान देवाने जगभरातील नेत्यांना शस्त्रस्पर्धा संपविण्यासाठी प्रेरित करावे. 
- पोप फ्रान्सिस, व्हॅटिकन सिटी 

श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून निषेध 
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमुळे जगालाही धक्का बसला असून, बहुतेक जागतिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत श्रीलंका सरकारला सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

या बॉंबस्फोटांमध्ये ब्रिटिश, हॉलंड, जपानी आणि अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाला. "ईस्टर संडे'च्या दिवशीच चर्च आणि हॉटेलमध्ये हे स्फोट केले गेल्याने ख्रिस्ती धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्फोट घडवून आणल्याचा अंदाज आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र राहून प्रत्येक धर्माच्या नागरिकाला निर्भयपणे वावरण्यास सहकार्य केले पाहिजे, असे थेरेसा मे म्हणाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांना आणि पंतप्रधानांना दूरध्वनी करत त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. 

जागतिक नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया 
- मार्क रूट, पंतप्रधान, हॉलंड : ही अत्यंत वाईट घटना असून, ईस्टर संडेला हा हल्ला होणे धक्कादायक आहे. 
- स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया : श्रीलंकेच्या नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. 
- जेसिंडा अर्डर्न, पंतप्रधान, न्यूझीलंड : सर्व प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध आहे. आम्ही धर्मस्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. आपण सर्वांनी एकत्र येऊन हिंसाचारावर उत्तर शोधायला हवे. 
- कॅथोलिक चर्च, जेरुसलेम : या हल्ल्यात मृत झालेल्यांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. श्रीलंकेतील सर्व धर्मांच्या आणि वंशाच्या नागरिकांच्या बरोबर आहोत. 

ट्रम्प यांची चूक 
चुकून विपरीत विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीलंकेतील हल्ल्यांचा निषेध करतानाही चूक केली. या हल्ल्यांबाबत दु:ख व्यक्त करतानाच या घटनेत 13.80 कोटी नागरिक मृत्युमुखी पडल्याचे त्यांनी ट्‌वीटरवर जाहीर केले होते. यावर लोकांनी त्यांच्यावर टीका केली. एका श्रीलंकेच्या नागरिकाने तर, "आमची लोकसंख्याच दोन कोटी आहे. त्यामुळे तुमची आकडेवारी चुकीची आहे. तुमचे सांत्वन तुमच्याजवळच ठेवा, आम्हाला नको,' असे फटकारले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com