इन्फ्लुएन्झापेक्षाही कोरोना घातक ठरेल; १९१८च्या साथीची तुलना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

corona dangerous than influenza says researchers  इन्फ्लुएन्झाच्या साथीचा प्रभाव 1918 ते 1919 या कालावधीत होता. तेव्हा जगाची लोकसंख्या जवळपास 2 अब्ज इतकी होती. यापैकी 5 कोटी लोकांचा मृत्यू इन्फ्लुएन्झामुळे झाला होता.

न्यूयॉर्क - अमेरिकेसह (america) जगात १९१८ मध्ये आलेली शीतज्वराची (influenza) साथ ही आतापर्यंतची सर्वांत प्राणघातक समजली जाते. सध्याची कोरोनाची (Corona) जागतिक साथही तेवढीच घातक आहे आणि ती आटोक्यात आणण्यात जगभरातील नेते व सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना अपयश आले तर कोरोनामुळे होणारी प्राणहानी अधिक चिंताजनक असेल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. 

शतकापूर्वी आरोग्य सुविधांचा अभाव 
यासंबंधी संशोधनपर लेख ‘जामा नेटवर्क ओपन’ या वैद्यकीय नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या लेखाचे मुख्य लेखक डॉ. जेरेमी फाउस्ट एका मुलाखतीत म्हणाले, की न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा जो उद्रेक झाला आहे, तो १९१८ मधील फ्लूच्या साथीच्या तुलनेत ७० टक्के घातक आहे. त्या वेळी लोकांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे आजच्यासारखी व्हेंटिलेटर किंवा अन्य अत्याधुनिक साहित्य नव्हते. संशोधकांनी या अभ्यासासाठी रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी), न्यूयॉर्क शहर आरोग्य आणि मानसिक स्वच्छता विभाग आणि अमेरिकेतील जनगणना विभागाने प्रसिद्ध केलेली माहितीचा आधार घेतला आहे. 

हे वाचा - रशियाच्या कोरोना लशीची भारतात चाचणी नाहीच; डोस मिळणार की नाही?

न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक मृत्यू 
न्यूयॉर्क शहात १९१८ च्या फ्लूच्या साथ भरात असताना सर्वाधिक मृत्यू नोंदविले गेले, तेवढ्या मृतांची संख्या कोरोनाच्या पहिल्या काही महिन्यांतच न्यूयॉर्कमध्ये झाली, अशी तुलना संशोधकांनी केली आहे. १९१८च्या फ्लूच्या साथीत मृत्युदर सर्वांत जास्त होता. पण आता आधुनिक वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सुधारित स्वच्छता यंत्रणा असूनही मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. ही संख्या १९१८पेक्षा जास्त असल्याचे दिसून येते, असे या लेखात म्हटले आहे. गेल्या शतकापेक्षा आता आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याने जगभरात कोरोनापासून बचावलेल्या रुग्णांची निश्‍चित संख्‍या कळू शकलेली नाही. त्यामुळे या संशोधनाला मर्यादा असल्याचेही यात नमूद केले आहे. 

इतिहासाचा विचार केला तर कोरोनाव्हायरसची साथ ही जागतिक आहे. इतिसाहाच्या पुस्तकात कोरोनाची १९१८च्या फ्लूच्या साथीची निश्‍चित तुलना होईल. 
डॉ. अँथोनी फाउसी, संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ, अमेरिका 

इन्फ्लुएन्झाच्या साथीचा प्रभाव 1918 ते 1919 या कालावधीत होता. तेव्हा जगाची लोकसंख्या जवळपास 2 अब्ज इतकी होती. यापैकी 5 कोटी लोकांचा मृत्यू इन्फ्लुएन्झामुळे झाला होता. तेव्हासुद्धा एकट्या अमेरिकेतील 6 लाख 75 हजार जणांचा या साथीच्या आजारात बळी गेला होता. जगाने त्याआधी पहिल्या महायुद्धात सर्वाधिक मृत्यू पाहिले होते. पहिल्या महायुद्धात 2 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona dangerous than influenza says researchers