Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा प्रसार मंदावला

पीटीआय
बुधवार, 4 मार्च 2020

‘युद्धा’साठी ब्रिटिश सज्ज
लंडन : कोरोनाग्रस्तांची संख्या ३९ झाल्याने खडबडून जागे झालेल्या ब्रिटनने अनेक उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शाळा बंद ठेवणे, जाहीर कार्यक्रम रद्द करणे, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना करणे यांचा समावेश होऊ शकतो. या संकटाशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. कोरोनाचा सामना करण्यासाठी ब्रिटन सरकारला आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे अधिकार देण्याबाबतचे विधेयकही लवकरच संसदेत मांडले जाणार आहे.

बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेले १२५ नवे रुग्ण सापडले असून, ३१ जणांचा आज बळी गेला आहे. विषाणूचा प्रसार होत असल्यापासून ही वाढ कमी प्रमाणात असल्याने प्रसार मंदावला असल्याचा अंदाज चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तरीही येथील एकूण बळींची संख्या २९४३ वर पोचली असून, ८० हजारांहून अधिक जणांना बाधा झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना व्हायरसची (कोविद-१९) ९१,३४७  प्रकरणे आढळली असून, ३,१२० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ७७ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असून, कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू असलेल्या हुबेई प्रांतात विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. या विषाणूच्या प्रसाराच्यापार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘अशा प्रकारच्या विषाणूचा प्रथमच संसर्ग झाला असून, त्याचा प्रभाव रोखणे हेच मुख्य लक्ष्य आहे,’ असे या संघटनेने म्हटले आहे.

टास्क फोर्समध्ये भारतीय वंशाची महिला
वॉशिंग्टन - अमेरिका सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये सीमा वर्मा यांचा समावेश केला आहे. वर्मा या अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्य धोरणविषयक सल्लागार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जानेवारीलाच या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पथकात वर्मा यांची निवड केल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी आज सांगितले. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखायच्या, त्याचे नियोजन हा टास्क फोर्स करत आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या आत कोरोना व्हायरसवर उपाय शोधला जाईल, असा विश्‍वास पेन्स यांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona spread in China slows down