Corona Virus : WHO कडून 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' जाहीर

वृत्तसंस्था
Friday, 31 January 2020

कोरोना विषाणूचा धोका वाढल्यानंतर प्रवास आणि व्यापारावर निर्बंध घालण्यासारखे उपाय योजण्यात आले आहेत. मात्र अशा उपायांची गरज नाही, असेही टेड्रोस यांनी सांगितले.

जिनेव्हा : कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणुमुळे चीनमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतरच सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य तो समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. "सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याचं कारण केवळ चीनमध्ये काय घडतंय हे नाहीय, तर इतर देशामध्ये काय होतंय, हे आहे," असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहेनम यांनी म्हटलंय.

याबाबत टेड्रोस यांनी सांगितले की, आम्ही सर्वांनी एकत्र मिळून कोरोना विषाणूचा फैलाव रोखला पाहिजे. केवळ आम्ही सर्वजण एकत्र येऊन या संकटाचा सामना करू शकतो. टेड्रोस यांनी गेल्या आठवड्यात चीनचा दौरा केला होता. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. कोरोना विषाणूचा धोका वाढल्यानंतर प्रवास आणि व्यापारावर निर्बंध घालण्यासारखे उपाय योजण्यात आले आहेत. मात्र अशा उपायांची गरज नाही, असेही टेड्रोस यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान,  कोरोना विषाणूचा धोका उत्पन्न झाल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना वुहानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वुहानमधून येणाऱ्या लोकांवरही बंदी घातली आहे. तर रशियाने चीनकडील आपली पूर्व सीमा बंद केली आहे. 

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्याने देशात घबराट पसरली आहे. वुहान विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी केरळमध्ये परतल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत दाखल केलेल्या सहापैकी तिघांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिल्लीत ज्या तिघांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मुंबईच्या दहिसरमधील एका तरुणाला गुरुवारी कोरोनाच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अन्य देशांतून शांघायमार्गे भारतात आला आहे, असे सांगण्यात आले. मुंबईसह देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय खबरदारी घ्यावी?

  1. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अगदी साध्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ करणं, मास्क घालणे, आणि योग्य आहार या उपाययोजनांचा समावेश आहे.
  2. ज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
  3. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस शिंक आली तर समोरच्या व्यक्तीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदा. नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल धरणं, निरोगी व्यक्तींपासून दूर राहणं, नियमित स्वच्छता अशा उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे.
  4. जवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला लागण झाली की दुसरी व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सुरुवात करतो. मात्र बाह्यजगाशी संपर्क आल्यावर किती प्रमाणात लागण होते याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus increased declared international emergency world health organization