कोरोनाचा द. कोरिया, इराणमध्ये वेगाने प्रसार 

वृत्तसंस्था
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

इराणमध्ये दहा जणांना याची लागण झाल्याचे उघड झाले आहे. इटलीमध्येही या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये एक शहरच या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. 

बिजिंग - चीनमधील कोरोना विषाणूंचा संसर्ग आणि मृतांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट होत असतानाच आता हा विषाणू अन्य देशांमध्ये पसरू लागल्याने संशोधकांच्या चिंता वाढल्या आहेत. दक्षिण कोरियात या विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या एका दिवसात दुप्पट झाली असून, इराणमध्ये दहा जणांना याची लागण झाल्याचे उघड झाले आहे. इटलीमध्येही या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये एक शहरच या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

दक्षिण कोरिया, इटली, लेबनॉन आणि इराणमध्ये हा विषाणू वेगाने पसरू लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला असून, या विषाणूंचा आंतरराष्ट्रीय प्रसार रोखण्याची संधी आपण गमावत असल्याचे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण कोरियात नव्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४३३ वर गेली असून, ती लवकरच हजारांचा आकडा ओलांडण्याची भीती व्यक्त होते आहे. मागील आठवड्यामध्ये एकही नवीन रुग्ण नसलेल्या इराणमध्ये आता दहा जणांना याची लागण झाली असून, आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. आता येथील विषाणूंचा एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या २८ वर गेली असून, मृतांची संख्या पाचवर पोचली आहे. जपानमध्येही १४ जणांना कारोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. 

...तेथेही पोचला विषाणू 
इटलीतील पंधरा हजारांची लोकसंख्या असणारे कोडोग्नो हे शहर पूर्णपणे बंद करण्यात आले असून, येथे तिघांना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. यातील एका ३८ वर्षीय व्यक्तीस जीवरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरोस घेबरेयेसूस यांनी या विषाणूच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली. ज्या देशांचा चीनशी कसलाही संबंध नाही तेथे या विषाणूचा होणारा प्रसार चिंताजनक असून, या विषाणूला रोखण्यासाठी सर्वच देशांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. त्याच्या प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या देशांसाठी ६७५ दशलक्ष डॉलर तजवीज आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आफ्रिकेलाही मोठा धोका 
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ७६ हजार २८८ वर पोचली असून शुक्रवार अखेरपर्यंत मृतांचा आकडा २ हजार ३४५ वर गेला होता. हुबेईमधील मृतांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. काही रुग्णांमध्ये उशिराने कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. आफ्रिका खंडातील तेरा देशांना या विषाणूंपासून विशेष काळजी घ्या लागणार असून या देशांचा थेट चीनशी संबंध असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Spreads To Iran and south korea Country

टॅग्स
टॉपिकस