कोरोनाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा 361 वर; केरळमध्ये तिसरा रूग्ण 

पीटीआय
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

बीजिंग : चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूंमुळे झालेल्या बळींचा आकडा 361 वर पोहोचला असून 17 हजार 205 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. 

चीनमध्ये ‘कोरोना’चा बळींचा आकडा तीनशेवर

बीजिंग : चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूंमुळे झालेल्या बळींचा आकडा 361 वर पोहोचला असून 17 हजार 205 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. 

चीनमध्ये ‘कोरोना’चा बळींचा आकडा तीनशेवर

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की रविवारी कोरोना विषाणूमुळे 57 जणांचा मृत्यू झाला असून 2 फेब्रुवारी रोजी देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेले 2,829 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे या रुग्णांची एकूण संख्या 17,205 झाली आहे. तर आतापर्यंत यामुळे 361 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विषाणूंच्या प्रादुर्भावाने रविवारी झालेल्या मृतांमधील 56 जण हे एकट्या हुबेई प्रांतातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, रविवारी चीनमध्ये कोरोनाचे 5 हजार 173 संशयीत रुग्ण अढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच रविवारी 147 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 186 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Image result for coronavirus at china

चीनमध्ये गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान 
कोरोना विषाणूमुळे आठवडाभरानंतर सुरु झालेल्या शेअर बाजारात आज जोरदार पडझड झाली. चीनमधील मुख्य शेअर बाजार "शांघाई इंडेक्‍स' आठ टक्‍क्‍यांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 420 अब्ज डॉलरचे म्हणजेच 29 लाख 40 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. "कोरोना'च्या भीतीने गुंतवणूकदारांनी शेअर्सची चौफेर विक्री करून पैसे काढून घेतले आहेत. यामुळे चीनचे चलन "युआन'मध्ये देखील डॉलरच्या तुलनेत 1.2 टक्‍क्‍यांचे अवमूल्यन झाले आहे. 

'HIV'ची औषधे वापरुन कोरोना व्हायरस केला बरा; थाई डॉक्टर्सचा दावा

फ्रान्समध्ये अढळले वीस संशयीत रुग्ण 
फ्रान्सने चीनमधील वुहान येथून देशात परत आणलेल्या आपल्या 250 नागरिकांपैकी 20 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याची शक्‍यता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सध्या त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या आरोग्यमंत्री ऍग्नेस बुझिन यांनी दिली आहे. 

चीनमध्ये आता बर्ड फ्लूचा धोका 
चीनमध्ये आता कोरोना विषाणू धुमाकूळ घालत असून आता चीनमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. हुआन प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात रविवारी एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने चीनमध्ये बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे पोल्ट्री फार्म दक्षिण सीमेवर आहे. सध्या चीनमध्ये करोनाची प्रचंड भीती आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाला असला तरी अद्याप कोणाही व्यक्तीमध्ये एच5एन1 हे विषाणू आढळले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळमध्ये आढळला "कोरोना'चा तिसरा रुग्ण 
केरळमध्ये करोना विषाणूची लागण झालेला तिसरा रुग्ण अढळला आहे. थ्रिसूर वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णाला दाखल करण्यात आले असून, डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. केरळमध्ये आठवड्याभरात कोरोना विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण आढळले आहेत. चीनमधून परतलेल्या भारतीयांना स्वतंत्र कक्षात ठेवण्याची केंद्र सरकारने सूचना केली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हा रुग्ण नुकताच चीनमधील वुहानमधून भारतात परतला होता. वुहान शहर हे कोरोनाचे केंद्रबिंदू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus spreads in major numbers at China