Coronavirus:कोरोनाचा ह्युंदाईनंतर सॅमसंगला फटका; दोन मोबाईलचं उत्पादन थांबलं!

टीम ई-सकाळ
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत दगावणाऱ्यांची संख्या दोन हजार ४४२ इतकी झाली आहे. तर कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार इतकी झाली असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोडोग्नो (दक्षिण कोरिया)  Coronavirus : चीन पाठोपाठ आता दक्षिण कोरियामध्ये कोरानाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. कोरियामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून करोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, ५५६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. राजधानी सेऊलमध्ये आत्तापर्यंत ९ हजारहून अधिकजणांची स्क्रिनिंग करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी या वेळी नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ह्युंदाईनंतर सॅमसंगला फटका 
कोरोनाच्या फैलावामुळं दक्षिण कोरियामध्ये ह्युंदाई कंपनीच्या कार उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपनीचा कारचे बरेच स्पेअर पार्ट्स चीनमध्ये तयार होत आहेत. चीनमध्ये अनेक कारखाने बंद पडल्यामुळं त्यांचा परिणाम ह्युंदाईवर झाला आहे. आता कोरियातील सॅमसंग या जगातील बड्या मोबाईल उत्पादन कंपनीवरही कोरोनाचा परिणाम दिसू लागला आहे. सॅमसंगच्या फॅक्टरीमधील कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळं फॅक्टरीला तात्पुरतं बंद करण्यात आलंय. फॅक्टरी उद्या (24 फेब्रुवारी) पर्यंत बंद राहणार असून, 25 फेब्रुवारीपासून काही ठराविक कामगारच कामावर हजर करण्यात येणार आहेत. करोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून न्यूमोनिआ आणि करोना सदृष्य आजारांनी बाधित असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी चिओंगडो रुग्णालयातून इतरत्र हालवण्यात येत आहे. यातील १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. 

आणखी वाचा - कोरोना इटली, इराणमध्येही पसरला; धोका आणखी वाढला

महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह 
सॅमसंगने स्मार्टफोन क्षेत्रात फोल्डेबल मॉडेल आणणार असल्याचं जाहीर केलंय. त्यासाठी कंपनी दोन मॉडेल्सवर काम करत आहेत. गॅलेक्सी फोल्ड आणि गॅलेक्सी फ्लिप, अशी दोन मॉडेल्स सध्या कंपनीनं तयार करायला सुरुवात केली आहे. पण, कोरोनाच्या फैलावामुळं या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. सॅमसंगच्या फॅक्टरीचं काम बंद राहिलं तर, या दोन मॉडेल्सचं लाँचिंग पुढं ढकलंल जाणार आहे. 

आणखी वाचा - कोरोनामुळं विमान कंपन्यांची वाडले तीन-तेरा

कोरोनामुळे दोन हजार ४४२ जणांचा मृत्यू 
बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत दगावणाऱ्यांची संख्या दोन हजार ४४२ इतकी झाली आहे. तर कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार इतकी झाली असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान शनिवारी कोरोना विषाणूचे मुख्य केंद्र असलेल्या चीनमधील वुहान शहराचा जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी दौरा केला. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी आपल्या चिनी समीक्षांबरोबर एक संयुक्त तपास पथक बनवले आहे. या पथकाने आरोग्य संस्थांचा दौरा केला आहे. हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटले की, या पथकात अमेरिका, जर्मनी, जपान, नायजेरिया, रशिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact south korea samsung shut down temporarily