असा देश ज्याने 6 दिवसात चार देशांना चितपट केले होते

कार्तिक पुजारी
मंगळवार, 7 जुलै 2020

सहा दिवसांचे युद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात इस्त्राईल या एका छोट्या देशाने आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या चार देशांचा पराभव केला होता. इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इराक या देशांना पराभवाचं पाणी पाजून इस्त्राईलने भीमपराक्रम दाखवला होता.

सहा दिवसांचे युद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात इस्त्राईल या एका छोट्या देशाने आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या चार देशांचा पराभव केला होता. इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इराक या देशांना पराभवाचं पाणी पाजून इस्त्राईलने भीमपराक्रम दाखवला होता. सैन्य आणि शस्त्रास्त्र संख्या शत्रू राष्ट्रांपेक्षा कितीतरी कमी असताना योग्य रणनीतीच्या आधारे इस्त्राईलने विजय मिळवला. 5 जून 1967 रोजी सुरु झालेले हे युद्ध 10 जून 1967 रोजी संपले, म्हणजे अवघ्या सहा दिवसात इस्त्राईलने आपण काय करु शकतो हे जगाला दाखवून दिलं होतं.

इस्त्राईल हा यहुदी म्हणजे ज्यू लोकांचा एकमेव देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 90 लाख आहे. यहुदी लोकांनी भूतकाळात असंख्य अत्याचार सहन केले आहेत. हिटलरने केलेले ज्यू हत्याकांड तर आपणास माहिती आहे. यावेळी हिटरने जवळजवळ 60 लाख ज्यूंची हत्या केल्याचं सांगितलं जातं. 1947 पूर्वी ज्यू धर्मियांचा देश अस्तित्वात नव्हता. यहुदी लोक जगभर पसरलेले होते. ब्रिटनने दिलेल्या वचनाप्रमाणे ज्यूंना पॅलेस्टिनमध्ये राहण्याची अनुमती मिळाली होती. 1948 साली इस्राईलची जेव्हा निर्मिती झाली  तेव्हा तेथे केवळ 10 टक्के यहुदी होते, तर 90 टक्के पॅलेस्टिनी राहत होते. पण आता तेथे उलट झालं आहे. आता येथे बहुसंख्याक इस्त्राईली आहेत. इस्त्राईलने हळूहळू पॅलेस्टिनचा भाग बळकावायला सुरुवात केली आणि आज बहुतांश भाग इस्त्राईलच्या ताब्यात आहे.  

1967 च्या युद्धाची पार्श्वभूमी

1948 मध्ये इस्राईलची स्थापन झाल्यापासून अरब आणि इस्त्राईलमध्ये वादाची ठिणगी पडली होती. 1948 मध्ये अरब आणि इस्त्राईलमध्ये पहिले युद्ध झाले होते. यात इस्त्राईलचा विजय झाला होता. अमेरिका कायमच इस्त्राईलच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे. 1956 मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि इस्त्राईलने इजिप्तमधील सुवेझचा ताबा घेतला होता. यामुळे अरब राष्ट्र इस्त्राईलवर चिडून होते. इस्त्राईलचा कशाही पद्धतीने काटा काढणे हेच अरबांचं उद्धिष्ट झालं होतं. त्यात ठिणगी पडली ती सोव्हियत युनीएनच्या (आताचा रशिया) एका बातमीनं.  इस्त्राईल इजिप्तवर हल्ला करणार आहे, अशी बातमी सोव्हिएतच्या गुप्तचरांनी दिली होती. ही बातमी खोटी होती, पण त्याचा जो परिणाम व्हायचा होता तो झाला. त्यात इस्त्राईलने सिरियाचे फायटर जेट उडवले होते. त्यामुळे तर तणाव अधिकच वाढला.

No photo description available.

इजिप्तने इस्त्राईलसोबत लढाई करण्याची तयारी सुरु केली. इजिप्त आणि सिरियामध्ये युद्धात मदत करण्याचा करार झाल्याने सिरियानेही युद्धाची तयारी सुरु केली. त्यांना जॉर्डन आणि इराक यांचीही मदत मिळाली. इजिप्तने स्ट्रेट ऑफ रेटानमधून इस्त्राईलची जाणारी जहाजे पूर्णपणे अडवून धरली. यामुळे इस्त्राईलचा पूर्ण व्यापार बंद पडला. इस्त्राईला कळून चुकले की आता युद्धाशिवाय पर्याय नाही. इस्त्राईलने पहिली चाल करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे शत्रूने हल्ला करण्यापूर्वी आपणच हल्ला करायचा आणि शत्रूला बेसावध अवस्थेत हाणून पाडायचं.

युद्धाची सुरुवात

इस्त्राईलकडे एकूण 1 लाख सैनिक होते तर शत्रू राष्ट्रांकडे मिळून  2.5 लाख. शिवाय शस्त्रास्त्रांची संख्याही इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इराक यांच्याकडे मिळून अधिक होती. त्यामुळे इस्त्राईलला याची जाणीव होती की आपण समारोसमोरच्या युद्धात विरोधी आघाडीसोबत जिंकू शकत नाही. इस्त्राईलने एक डाव खेळला. इस्त्राईलने माध्यमात अशा बातम्या पसरवल्या की आमचे लष्कर काही दिवसांच्या सुट्टीवर गेले आहे. या सर्व अफवा होत्या. 5 जून रोजी अचानक इस्त्राईलने ऑपरेशन फोकस लॉन्च केले. यावेळी इजिप्त युद्धाची तयारी करत होतं, मात्र बेसावध होतं. 5 जून रोजी 200 इस्त्राईली लढाऊ एअरक्राफ्ट इजिप्तच्या हद्दीत घुसली.  त्यांनी इजिप्तमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. इजिप्तच्या 14 हवाई तळांना यात लक्ष्य करण्यात आले. इजिप्तच्या सैनिकांना काही कळण्याआधीच हा हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांना विमान उड्डानालाही वेळ मिळाला नाही. इजिप्तची 350 लढाऊ विमानं यात उद्धवस्त झाली. त्यानंतर इस्त्राईली विमानांनी जॉर्डन देशाकडे आपला मोर्चा वळवला. जॉर्डन, सिरिया आणि इराक या तीन देशांच्या लढाऊ विमानांना इस्त्राईलच्या विमानांनी टिपले. केवळ चार तासातच इस्त्राईलने चार देशांच्या हवाई ताकदीला नष्ट केले होते.

6 जून रोजी मैदानी युद्धाला सुरुवात झाली. चारी देशांनी इस्त्राईलच्या चारी बाजूंनी हल्ला सुरु केला. पण इस्त्राईलच्या सैनिकांनी त्यांचा चोख प्रतिकार केला. इस्त्राईलकडे कमी सैन्य होते. मात्र, हवाई दलाने या सैन्याला मदतीचे काम केले. त्यामुळे युद्दाचे पूर्ण रुपचे पालटले. पुढील चार दिवसातच इस्त्राईलने चार देशांना चितपट केले.

शत्रू राष्ट्रांचा बराचसा भाग ताब्यात घेतला

इस्त्राईलने युद्धादरम्यान पवित्र शहर जेरुसलेम, सिरियाकडून गोलन हाईट, इजिप्तचा सिनाई पेनेसुला, गाझा स्ट्रिप, वेस्ट बॅक इत्यादी प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर युनायटेड नेशनच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले. सहा दिवसांतर 10 जून रोजी सिझफायरची घोषणा करण्यात आली. 132 तास हे युद्ध सुरु होते, यात 20 हजार अरब सैनिक मारले गेले होते, तर 800 इस्त्राईली सैनिकांचा मृत्यू झाला होता. इस्त्राईलने आपल्या ताकदीची चुणूक संपूर्ण जगाला दाखवून दिली होती. इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल नासीर यांनी या मानहानीकारक पराभवामुळे राजीनामा दिला होता. 

ट्रम्प ठेवणार मोदींच्या पावलावर पाऊल; चीनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता
सहा वर्षानंतर 1973 साली पुन्हा एकदा अरब आणि इस्त्राईलमध्ये युद्ध झाले. यातही पुन्हा एकदा इजिप्त आणि सिरियाचा पराभव झाला. मात्र, अरब राष्ट्रांनी यावेळी तेल अस्त्राचा वापर केला. त्यामुळे जगभरात तेल संकट निर्माण झाले. अमेरिकेच्या दबावामुळे इस्त्राईलने इजिप्तला सिनाई पेनेसुला, सिरियाला गोलन हाईट्सचा काही भाग परत केला. त्यानंतर अरब राष्ट्र आणि इस्त्राईलमध्ये मोठे युद्ध झाले नाही. मात्र, हा भाग नेहमीच खदखदत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A country that had defeated four countries in 6 days