बीजिंग - चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपेक) प्रकल्पात अडथळे आणण्यासाठी भारताची गुप्तचर संस्था "रॉ'ने 50 कोटी डॉलर खर्च करून नवीन गुप्तचर विभाग स्थापन केल्याचा पाकिस्तानचा दावा चीनने फेटाळून लावला. अशा प्रकारची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे चीन सरकारने म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या संयुक्त समितीचे प्रमुख जनरल झुबेर मेहमूद हयात यांनी गेल्या आठवड्यात भारतावर टीका केली होती. "भारताच्या "रॉ'ने 50 कोटी डॉलर खर्च करून "सीपेक'मध्ये अडथळे आणण्यासाठी विशेष गुप्तचर विभाग स्थापन केला आहे. पाकिस्तानमध्ये अशांतता निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. बलुचिस्तानमध्येही भारताकडून दहशतवाद पसरविला जात आहे,' असे आरोप हयात यांनी केले होते.
मात्र, या आरोपांना चीनने आज अजिबात गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. आमच्याकडे "रॉ'च्या अशा हालचालींबाबत माहिती नाही, असे सांगत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हयात यांचे आरोप फेटाळून लावले. चीन हा पाकिस्तानला सार्वकालिन मित्र मानत असल्याने आणि भारताबरोबर काहीसे तणावाचे संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनकडून असे आरोप फेटाळण्याला महत्व आहे. "सीपेक'चा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याबद्दल भारताला असलेल्या आक्षेपाचीही चीन सरकारने नोंद घेतली असून सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे चीनने म्हटले आहे.
|