फिडेल कॅस्ट्रो : क्रांतिनायक

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

1997 मध्ये त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचे जे आकडे प्रसिद्ध झाले ते कॅस्ट्रो यांच्या तोपर्यंतच्या प्रतिमेशी विसंगत होते. मात्र, एक नक्की, की आर्थिक शोषणात व लष्करी हडेलहप्पीत भरडल्या जाणाऱ्या व्यक्ती आणि समाजांमध्ये बंडखोरीची ठिणगी जेव्हा जेव्हा निर्माण होईल तेव्हा तेव्हा फिडेल कॅस्ट्रो व त्यांचा दिवंगत सहकारी चे गव्हेरा ही नावे त्या बंडखोरांच्या हृदयावर कोरलेली असतील.

फिडेल कॅस्ट्रो यांना एकच व्यक्ती सत्तेवरून हटवू शकते; ती म्हणजे स्वतः कॅस्ट्रोच, हे सिद्ध करीत ते स्वतःहून क्‍यूबाच्या अध्यक्षपदावरून 2008 मध्ये पायउतार झाले.   त्यांची कारकीर्द अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात...

फिडेल कॅस्ट्रो क्‍यूबाच्या सत्तेवरून दूर झाले असल्याने इतिहासातील एक अध्याय पूर्ण झाला. तब्बल पाच दशके लॅटिन अमेरिकेतील या राज्याची सत्ता कॅस्ट्रोंकडे होती; पण केवळ एका देशाचे सत्ताधीश अशी यांची ओळख कधीच मर्यादित राहिली नाही. बलाढ्य सत्तेला त्यांनी केलेल्या पोलादी प्रतिकारामुळे ते प्रस्थापित व शोषक शक्तींविषयी चीड असलेल्या जगभरच्या तरुणांचे हीरो बनले. लॅटिन अमेरिकी देश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहेत. तिथे कोणती राजवट असावी, हे ठरविण्यात अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे त्या हितसंबंधांशी जुळवून घेत राज्य करणाऱ्यांनाच अमेरिकेचा पाठिंबा असतो.

क्‍यूबाचा बॅप्टिस्टा हा अशा तऱ्हेचा हुकूमशहा होता. त्याला जनतेच्या हालअपेष्टांशी घेणे-देणे नव्हते. कॅस्ट्रो यांनी आपला देश या हुकूमशाही व जुलमी राजवटीपासून मुक्त करण्याचा चंग बांधला. 1959 मध्ये आपल्या तुटपुंज्या सैन्यानिशी त्यांनी हुकूमशहाची राजवट धुळीला मिळविली. ऐन तारुण्यातील हे अभूतपूर्व यश कॅस्ट्रो यांनी मिळविले तेव्हा ते साम्यवादी नव्हते; पण क्‍यूबाच्या सत्तेवर आलेल्या कॅस्ट्रो यांनी आपला देश दारिद्य्राच्या खाईतून बाहेर काढण्याचा निर्धार केला व साम्यवादाची कास धरली. हे एक प्रचंड आव्हान त्यांनी स्वीकारले होते.

जगभर आपल्या आर्थिक व लष्करी शक्तीच्या जोरावर दबदबा निर्माण करणाऱ्या अमेरिकेला आपल्याच अंगणातील एक छोटा देश आपल्या कलाने वागत नाही, हे मानवणारे नव्हते. अमेरिकेने ही साम्यवादी राजवट हटविण्यासाठी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न करणे बाकी ठेवले नव्हते. क्‍यूबाची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली. कॅस्ट्रो यांना ठार मारण्याचे कट अनेक वेळा झाले. 1961 मध्ये तर क्‍यूबावर छुपे आक्रमणच झाले. तेव्हा सोव्हिएत युनियनचे आण्विक क्षेपणास्त्र आपल्या देशात आणण्यास परवानगी देण्याच्या कॅस्ट्रो यांच्या कृतीमुळे साऱ्या जगाने अण्वस्त्रयुद्धाच्या भीतीने श्‍वास रोखून धरले होते. सोव्हिएत संघराज्याने माघार घेतल्याने हे विनाशकारी संकट टळले. मात्र, कॅस्ट्रो नावाचे वलय जगभर पसरले. केनेडींपासून बुश यांच्यापर्यंत कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाला जंगजंग पछाडूनही कॅस्ट्रो यांना सत्तेवरून हटविता आले नाही. कॅस्ट्रो यांना एकच व्यक्ती सत्तेवरून हटवू शकते; ती म्हणजे स्वतः कॅस्ट्रोच, हे सिद्ध करीत ते स्वतःहून पायउतार झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बलाढ्य साम्यवादी सत्ता असलेले सोव्हिएत संघराज्य विघटित झाले. पाठोपाठ पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटीही एकापाठोपाठ एक कोसळल्या. चीनने साम्यवादाचे नाव टाकून न देता भांडवलशाही तत्त्वे स्वीकारली. अशी साम्यवादी चळवळीला ओहोटी लागलेली असतानाही "होय, मी कम्युनिस्ट आहे,' असे उच्चरवाने सांगणारे कॅस्ट्रो हे जिवंतपणीच एक दंतकथा बनले होते.

आणखी एका दृष्टीने त्यांनी केलेली बंडखोरी लक्षणीय आहे. ते पोथीनिष्ठ कम्युनिस्ट नाहीत. त्यांनी आपल्या देशाच्या परिस्थितीला अनुरूप असा मार्ग निवडत तंबाखूची शेती, तसेच साखरमळे यांचे फेरवाटप केले आणि तेथे सहकाराच्या तत्त्वाचा अवलंब करीत जनतेचे दारिद्य्र कमी करण्याचा प्रयत्न केला. सार्वत्रिक शिक्षण व सार्वत्रिक आरोग्यावर योग्यभर दिला. इतिहासात देदीप्यमान कामगिरी केली असली, तरी कुठलीही व्यक्ती दोषांपासून पूर्णपणे मुक्त नसते. कॅस्ट्रो हेही त्याला अपवाद नाहीत. सत्तेवरून स्वतः दूर झाल्यानंतरही आपल्या भावाकडेच त्यांनी ती सुपूर्द केली. तरुणपणी "समाजवाद किंवा मरण' अशी घोषणा देणाऱ्या कॅस्ट्रो यांनी नंतर अनेक तडजोडी केल्या. खासगीकरणाला काही प्रमाणात मुभा दिली.

1997 मध्ये त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचे जे आकडे प्रसिद्ध झाले ते कॅस्ट्रो यांच्या तोपर्यंतच्या प्रतिमेशी विसंगत होते. मात्र, एक नक्की, की आर्थिक शोषणात व लष्करी हडेलहप्पीत भरडल्या जाणाऱ्या व्यक्ती आणि समाजांमध्ये बंडखोरीची ठिणगी जेव्हा जेव्हा निर्माण होईल तेव्हा तेव्हा फिडेल कॅस्ट्रो व त्यांचा दिवंगत सहकारी चे गव्हेरा ही नावे त्या बंडखोरांच्या हृदयावर कोरलेली असतील.

Web Title: Cuba's Fidel Castro, former president, dies aged 90