
Cyclone Mocha : मोचा चक्रीवादळात सहा जणांचा मृत्यू
ढाका : मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला असून वादळासंबंधीच्या विविध घटनांमध्ये या देशात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. वादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत असून पाणी किनारपट्टीवरील गावात घुसल्याने अडकून पडलेल्या सुमारे एक हजार जणांना आज वाचविण्यात आले. मोचा वादळाने बांगलादेशच्या किनारी भागातही नुकसान केले आहे.
म्यानमारमधील सिटवे गावात उंचावर असलेले बौद्ध मठ, शाळा आणि इतर भक्कम इमारतींमध्ये सुमारे वीस हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. मात्र तरीही वेगवान वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे त्यांच्यापैकी ७०० जण जखमी झाले आहेत. म्यानमारमधील राखीन प्रांतातील दहा सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे.
राखीन भागात रोहिंग्या मुस्लिमांची वस्ती अधिक असल्याने याभागाकडे येथील लष्करशाहीचेही दुर्लक्ष आहे. मोचा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी जोरदार वारे आणि पाऊस यांचा जोर कायम असल्याचे प्रशासनाने सांगितले. म्यानमारमध्ये वादळाशी निगडित विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. बांगलादेशच्या किनारी भागातही वादळामुळे वित्त हानी झाली आहे.
वादळाची तीव्रता घटली
मोचा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. वातावरण बदलामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वादळे अल्पावधीतच तीव्र होतात, असे पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील हवामान तज्ज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले. समुदावरील वातावरण जोपर्यंत उष्ण आहे आणि वारे अनुकूल आहेत, तोपर्यंत वादळांची तीव्रता दीर्घकाळपर्यंत राहू शकते, असे कोल यांनी सांगितले.