रशिया दौऱ्यानंतर राजनाथ सिंहाचं विमान थेट इराणला; घेणार संरक्षणमंत्र्यांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 September 2020

संरक्षणमंत्री राजनाथसिंह शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला गेले आहेत. त्यांनतर ते इराणची राजधानी तेहरानकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

तेहरान- संरक्षणमंत्री राजनाथसिंह शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला गेले आहेत. त्यांनतर ते इराणची राजधानी तेहरानकडे रवाना झाल्याची माहिती आहे. कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून इराणला भेट देणारे ते पहिले मंत्री ठरले आहेत. राजनाथसिंह तेहरानमध्ये इराणचे संरक्षणमंत्री ब्रिगेडिअर जनरल आमिर  हातामी यांची भेट घेणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

इराण पश्चिम आशियातील महत्वाचा शेजारी देश आहे. भारताचे उर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीने इराणमध्ये हितसंबंध गुंतले आहे. या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय संबंध जपण्यासाठी राजनाथसिंह इराणला गेले आहेत. भारतासाठी इराण हा मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि युरोशियासाठी गेटवे आहे. 

उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेता अयातोल्ला खामेनी यांनी हिंदीमध्ये आपलं ट्विटर अकाऊंट सुरु करुन एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. असे असले तरी सध्या इराण आणि भारत या दोन देशांमधील अंतर वाढत चाललं आहे. इराणने नुकतेच चीनसोबत मोठा करार केला आहे. भारताने इराणच्या चाबहार बंदरासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, इराणचे आता चीनसोबतही संबंध वाढताना दिसत आहेत. 

२०१६ मध्ये इराण, भारत आणि अफगाणिस्तान या देशांनी मिळून चारी बाजूंनी जमिनीने वेढलेल्या अफगाणिस्तानसाठी व्यापारी मार्ग बनवण्याचे ठरवले होते. मागील वर्षी भारताने चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानला गहूचा पुरवढा केला होता. २०१९  मध्ये अफगाणिस्तान-भारत-इराणने चाबहार बंदारामार्गे असलेल्या व्यापारी कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले होते. 

अमेरिका आणि इराणचे संबंध स्फोटक बनले आहेत. अमेरिकेने या वर्षाच्या सुरुवातील इराणचे लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यानंतर इराणला भेट देणारे राजनाथसिंहे हे पहिले मंत्री ठरले आहेत. त्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

चीनच्या उलट्या बोंबा; वाचा देश-विदेशच्या महत्त्वाच्या ७ बातम्या

दरम्यान, राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये तब्बल दोन तास २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. सीमेवरील कुरापतींवरून भारताने चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. चीनने ताबा रेषेचा आदर करावा तसेच तेथील स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा एकतर्फी बदल करू नये असे ठणकावतानाच त्यांनी भारत स्वतःचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांच्यात शुक्रवारी प्रथमच समोरासमोर चर्चा झाली.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defence Minister Rajnath Singh to visit Iran