2500 वर्षांपूर्वीच्या ज्यू संस्कृतीचा शोध; समृद्ध इस्राईली राजवटीतले कोरीव दगड आढळले

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

इस्राईलमध्ये दोन हजार ७०० वर्षांपूर्वी ज्यू संस्कृती अस्तित्वात असल्याचे पुरावे पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळले आहेत.

जेरुसलेम- इस्राईलमध्ये दोन हजार ७०० वर्षांपूर्वी ज्यू संस्कृती अस्तित्वात असल्याचे पुरावे पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळले आहेत. या काळातील कोरीव दगड सापडल्याचे त्यांनी गुरुवारी (ता.३) जाहीर केले. प्राचीन जेरुसलेम राज्य नष्ट झाल्यावर सत्तेवर आलेल्या ज्यूंच्या समृद्ध राजवटीतील हे दगड असल्याचा निष्‍कर्ष पुरातत्वशास्त्रज्ञांनी काढला आहे.

भारतीय FAU:G लवकरच; PUB-G वर बंदीनंतर अक्षय कुमारची घोषणा

चुनखडीचे हे दोन दगड २० इंच रुंदीचे आहेत. दगडी खांबांच्या वरील भागात ‘प्रोटो- आयोलिक’ पद्धतीचे कोरीव काम केलेले आहे. बोकडाच्या वळणदार शिगांची आठवण या नक्षीतून होते. या कोरीव दगडांना ‘कॅपिटल’ असे म्हणतात. प्राचीन इस्राईलमधील इमारतीच्या बाह्य भागात असे नक्षीदार खांब उभारले जात असत. इस्राईलच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार असलेले हे दगड इस्राईल पुरातत्त्व प्राधिकरणाचे (आयएए) पुरातत्त्वशास्त्रज्ञ याकोव्ह बिलिंग यांना नोव्हेंबर महिन्यात आढळले होते. जेरुसलेमच्या ओल्ड सिटीच्या दक्षिणेकडे काही अंतरावर असलेल्या अरमॉन हनाझिव्ह प्रोमेनेड या शहरातील अभ्यागत केंद्राच्या बांधकामात हे दगड सापडले. तिसरा दगड काही आठवड्यांपूर्वी सापडला.

हे नक्षीदार दगड ज्या भागात सापडले आहे, तो भाग ज्यू राज्याचा होता. ९४० ते ५८६ या काळातील जेरुसलेम केंद्रित असलेली ज्यू राजवट बॅबिलिऑन राजवटीतील नेब्युशांडनेझ या राजाने संपुष्टात आणली. दगडांचे हे नक्षीकाम तेथील पहिल्या मंदिर युगातील असून ज्यू व इस्राईली राजवटीचे द्योतक आहे. या नक्षीदार दगडांची प्रतिमा इस्राईलच्या पूर्वीच्या पाच शेकल या नाण्यावर कोरलेली होती.

चीनचे विमान पाडले का नाही? तैवानने केला खुलासा

पुरातत्त्वशास्त्रज्ञ याकोव्ह बिलिंग म्हणाले...

- अरमॉन हनाझिव्ह येथे मध्यम आकारात हे दगड प्रथमच सापडले आहे.
- खिडक्यांच्या खालील भागात लहान आकारात वापरले जाणारे दगड यापूर्वी आढळले आहेत.
- ज्या भागात हे दगड आढळले तेथे गर्भश्रीमंताचा राजवाडा असण्याची शक्यता.
- राजा हेझेकिया आणि राजा जोईश याच्या काळात राजवाड्याची बांधणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The discovery of Jewish culture Carved stones from a prosperous Israeli kingdom were found