कोरोनाच्या लशीसाठी सायबर चोरी; अमेरिका, ब्रिटनचा रशियावर सर्वांत मोठा आरोप

कार्तिक पुजारी
Friday, 17 July 2020

कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक, डॉक्टर दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. अशात अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाने रशियावर लस संशोधनासंबंधी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे

लंडन- कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक, डॉक्टर दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. अशात अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाने रशियावर लस संशोधनासंबंधी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. रशिया वैद्यकीय संस्था आणि विद्यापीठांवर सायबर हल्ला करुन संशोधन चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा या तिन्ही देशांनी केला आहे. मात्र, क्रेमलिनने या आरोपाचे खंडन केले आहे. विशेष म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने कोरोना लसीचे पहिल्या टप्प्यातील परिक्षण पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.

भारत आणि चीन देशांमधील निवळत असलेला तणाव पुन्हा वाढला
सगळ्यात आधी लस निर्माण करावी किंवा सगळ्यांसोबत आपलीही लस तयार व्हावी, यासाठी रशिया संशोधन चोरण्याचा प्रयत्न करत आहे, असं देशांचं म्हणणं आहे. APT29 (Cozy Bear) नावाच्या हॅकिंग ग्रुपने हा सायबर हल्ला केला आहे. हा ग्रुप रशियाच्या गुप्त एजेंसीचा एक भाग आहे जो क्रेमलिनच्या इशाऱ्यावर काम करतो, असा दावा तिन्ही देशांनी संयुक्तपणे जारी केलेल्या वक्तव्यात करण्यात आला आहे. यामुळे या देशांमधील वाद येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटनने या सायबर हल्ल्यावरुन रशियाला धारेवर धरलं आहे. सायबर हल्ला करणाऱ्या अशा लोकांवर तिन्ही देश मिळून कारवाई करतील. सर्व जग कोरोना महामारीविरोधात लढत असताना रशियाचा संस्थांवर होणारा हल्ला सहन केला जाणार नाही, असा इशारा ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी दिला आहे. ब्रिटनच्या नॅशनला सायबर सेक्युरिटी सेंटरने दावा केला आहे की Cozy Bear रशियाच्या गुप्त संघटेनाचा भाग आहे. ही संस्था सरकारी, थिंक टँक, आरोग्य विभाग अशा संस्थावर सायबर हल्ला करुन माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि कॅनाडा या देशांनी ब्रिटनच्या या दाव्याला समर्थन दिलं आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे उद्यापासून ‘अनलॉक’
विशेष म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या तिन्ही देशांनी कोरोना विषाणूवरील लसीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीची मानवी चाचणी केली आहे. तसेच अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीवरील दुसऱ्या टप्प्याचे परिक्षण सुरु केले आहे. या दोन्ही देशांनी त्यांनी तयार केलेली लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. शिवाय रशियानेही काही दिवसांपूर्वी मानवी चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केल्याचा दावा केला आहे. तसेच  कोरोना लसीचे 20 कोटी डोस तयार करण्याची तयारी रशियाने सुरु केली आहे. त्यामुळे हे सायबर हल्ल्याचे प्रकरण जोर धरण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes between the US Britain and Russia even before the coronavirus vaccine was developed