व्हाइट हाउसमध्ये दिन..दिन...दिवाळी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

"जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो, तेव्हा विशेषत: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची निर्मिती करणाऱ्या भारतीयांची आठवण काढतो. भारत हा हिंदू धर्माचे निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या दृढ संबंधाला आपण अधिक महत्त्व देतो. 
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका 

वॉशिंग्टन : सध्या भारतासह जगभरात दिवाळीची धूम आहे. यास व्हाइट हाउसदेखील अपवाद राहिले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आज ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. ट्रम्प यांच्यासह सीमा वर्मा, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निकी हेलीसह प्रशासनाचे वरिष्ठ भारतीय भारत- अमेरिकी प्रतिनिधींनी दिवाळी साजरी केली. सीमा वर्मा या सेंटर फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सर्व्हिसेसच्या प्रशासक आहेत. 

अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पहिली दिवाळी साजरी करताना देशातील विज्ञान, औषधी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात भारत-अमेरिकी नागरिकांच्या अमूल्य योगदानाचे कौतुक केले. दिवाळीनिमित्त आयोजित सोहळ्यात यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै, मुख्य उपप्रेस सचिव राज शाह यांनी सहभाग घेतला. ट्रम्पने ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरा केल्याचा व्हिडिओ शेअर करत फेसबुकवरदेखील एक पोस्ट केली आहे. ट्रम्प म्हणाले की, भारतीयांबरोबर प्रकाशाचा सण दिवाळी साजरा करताना मी भाग्यवान समजतो. या सोहळ्यात ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पदेखील सहभागी झाली होती. व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी आपल्या कार्यकाळात सुरू केली. मात्र बुश यांनी व्यक्तिगतरीत्या कधीही दिवाळी सोहळ्यात सहभाग घेतला नाही. 

"जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो, तेव्हा विशेषत: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची निर्मिती करणाऱ्या भारतीयांची आठवण काढतो. भारत हा हिंदू धर्माचे निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या दृढ संबंधाला आपण अधिक महत्त्व देतो. 
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका 

Web Title: Diwali celebration in White House USA