'व्हॅलेंटाईन डे' नको; "सिस्टर्स डे' साजरा करा!

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

'रक्षाबंधना'शी तुलना

व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याच्या आदेशाची सोशल मीडियात अनेकांनी खिल्ली उडविली आहे. तसेच, सिस्टर्स डेची तुलना भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाशी करत काही जणांनी त्याला विरोध दर्शविला आहे. 

इस्लामाबाद : आगामी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याचा अजब निर्णय पाकिस्तानातील एका विद्यापीठाने घेतला आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण न करण्याचे आव्हान विद्यापीठाच्या कुलगुरुंनी केले आहे. ऐवढेच नव्हे, तर या दिवशी विद्यार्थिनींना स्कार्फ आणि शालींचे वाटपही करण्यात येणार आहे. 

पाकिस्तानातील फैसलाबाद कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही अजब शक्कल लढविली आहे. ""युवक मोठ्या प्रमाणात पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना दिसत आहेत. त्यामुळे पूर्वेकडील संस्कृती आणि इस्लामिक परंपरांची युवकांना ओळख करून देण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आगामी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करावा, अशी सूचना आम्ही विद्यार्थ्यांना केली आहे,'' असे कुलगुरू जफर इक्‍बाल यांनी म्हटले आहे. 

आगामी 14 फेब्रुवारी रोजी एक हजार विद्यर्थिनींना स्कार्फ, शाल आणि विद्यापीठाचा लोगो असलेल्या गाऊनचे वाटप करण्यात येणार आहे, असे संस्थेचे प्रवक्ते कमार बुखारी यांनी सांगितले. फैसलाबाद कृषी विद्यापीठात सुमारे 14 हजार विद्यार्थिनी शिक्षण घेतात. 

पाकिस्तानातील तरुणाई व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा करत असली तरी या मुस्लिम बहुल देशात त्याला मोठ्या प्रमाणात विरोधही केला जातो. सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी कार्यलयांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास 2017 मध्येच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच, पाकिस्तानातील टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांनीही व्हॅलेंटाईन डेला प्रोत्साहान देऊन नये, असे आदेश देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not Celebrates Valentine Day Celebrate Sister Day