डोकलाम वरून भारत-चीन युद्ध भडकणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जानेवारी 2018

डोकलाममधील मोक्‍याच्या ठिकाणांवरील भारतीय चौक्‍यांपासून अवघ्या दहा मीटर अंतरापर्यंतच्या जमिनीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी ताबा मिळविला असल्याचे दर्शविणारी उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाचे रुपांतर युद्धात होऊ शकते, अशी शक्‍यता द डेली स्टारने वर्तविली आहे

लंडन - चीन आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे अण्वस्रसज्ज असून, त्यांच्यात अणू युद्ध होऊ शकते का? यावरून अनेक मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. मात्र, डोकलामच्या मुद्यावरून भारत आणि चीनच्या दरम्यान युद्धाचा भडका उडू शकतो, अशी शक्‍यता लंडनमधून प्रकाशीत होणाऱ्या द डेली स्टार या वृत्तपत्राने वर्तविली आहे. डोकलामवरून भारत आणि चीनच्या दरम्यान युद्ध सुरू झाले तर जगभरातील इतर महासत्ताही त्यात उतरतील आणि त्याला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप प्राप्त होईल, अशी भीतीही वर्तविण्यात आली आहे.

वादग्रस्त ठरलेल्या डोकलामच्या पठारावर चीनच्या लष्करी वाहनांची उपस्थिती दिसून आल्यानंतर या मुद्यावरून तणाव वाढला असून, त्यामुळे या दोन देशांमध्ये युद्धाला तोंड फुटू शकते, अशी शक्‍यता द डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात वर्तविण्यात आली आहे.

डोकलाममधील मोक्‍याच्या ठिकाणांवरील भारतीय चौक्‍यांपासून अवघ्या दहा मीटर अंतरापर्यंतच्या जमिनीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी ताबा मिळविला असल्याचे दर्शविणारी उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाचे रुपांतर युद्धात होऊ शकते, अशी शक्‍यता द डेली स्टारने वर्तविली आहे.

दरम्यान, भारताने अग्नी-5 या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली असून, त्याचा पल्ला पाच हजार किलोमीटर आहे. त्यामुळे अन्गी-5च्या टप्प्यात जवळजवळ संपूर्ण चीन आणि युरोप येतो. मागील वर्षी डोकलाममधील चीनच्या हालचालींमुळे भारत - चीन तणाव शिगेला पोहचला होता.

डोकलाममध्ये चीन आक्रमक
डोकलाममधून चीनच्या लष्कराने मोठ्या प्रमाणात माघार घेतली असल्याचा दावा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मागील वर्षी केला होता. मात्र, सध्याची डोकलाममधील परिस्थिती पाहता चीन डोकलाममध्ये अधिक आक्रमकपणे पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. चिनी लष्कर डोकलाममध्ये कायमस्वरूपी बांधकाम करण्याच्या प्रयत्नांमध्ये असल्याचे संकेत त्यांच्या हालचालींवरून दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी काळात या मुद्यावरून तणावात वाढ होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doklam china india